Dombivli News: डोंबिवलीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवून एका 73 वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल 57 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर ओळख करून विश्वास संपादन करणाऱ्या एका आंतरराज्यीय भामट्याला डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. या फसवणुकीमुळे पीडित वृद्ध महिलेवर थेट वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली असून आरोपीने देशभरातील अनेक महिलांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीत राहणाऱ्या 73 वर्षीय वृद्ध महिलेने आयुष्याच्या उत्तरार्धात सोबती मिळावा यासाठी एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. तिथे तिची ओळख अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज सिंग उर्फ अनुज त्रिवेदी याच्याशी झाली.
आरोपीने या महिलेशी गोड बोलून जवळीक साधली आणि एकत्र राहण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध घरगुती आणि वैद्यकीय कारणे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 57 लाख रुपये उकळले. पैसे मिळाल्यानंतर त्याने संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
( नक्की वाचा : Kalyan: मित्र आणि बापाला VIDEO वाटून उच्चपदस्थ तरुणीवर अत्याचार; परदेशात लपलेला कल्याणचा आरोपी कसा पकडला? )
वयोवृद्ध महिलेवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ
या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे पीडित वृद्ध महिलेची आयुष्यभराची जमापुंजी संपुष्टात आली आहे. अचानक झालेल्या या आर्थिक आघातामुळे आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन न उरल्यामुळे या ज्येष्ठ महिलेवर आता थेट वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोपी भामट्याला दिल्लीतून अटक
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीत जाऊन आरोपी अनुज तिवारी याला बेड्या ठोकल्या. तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा राहणारा असून तो वेगवेगळी नावे सांगून महिलांना जाळ्यात ओढत असे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या भामट्याने केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मॅट्रिमोनियल साईट्सवर एकट्या राहणाऱ्या किंवा सोबतीच्या शोधात असलेल्या महिलांना लक्ष्य करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. त्याने आतापर्यंत किती महिलांना किती रुपयांचा गंडा घातला आहे, याचा अचूक आकडा शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : बेडरुममध्ये पतीचा मृतदेह, शेजारी जखमी मुलगा; आरोपी पत्नी बेडवर झोपून पाहत होती रील! वाचा काय आहे प्रकार? )
पोलिसांचे महिलांना आवाहन
आरोपी अनुज तिवारी सध्या न्यायालयीन कोठडीत असून विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या आरोपीने किंवा अशा प्रकारे इतर कोणत्याही व्यक्तीने मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली असेल, तर पीडित महिलांनी न घाबरता पुढे यावे आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विष्णूनगर पोलिसांनी केले आहे.