Kalyan News: लग्नाचे आमिष दाखवून एका उच्चपदस्थ तरुणीची फसवणूक केल्यानंतर, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची एक अत्यंत संतापजनक घटना कल्याणमध्ये उघड आली आहे. विकृतीची सीमा ओलांडत मुख्य आरोपीने या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि त्यानंतर त्याचे मित्र तसेच त्याच्या वडिलांनीही या तरुणीला ब्लॅकमेल करत तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 महिन्यांपासून पोलीस या नराधमांच्या शोधात होते. अखेर परदेशात पळून गेलेल्या या मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण येथील एका हायप्रोफाईल परिसरात राहणाऱ्या आणि प्रसिद्ध कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या तरुणीसोबत अरबाज खान नावाच्या तरुणाने ओळख वाढवली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरबाज खान हा गुन्हा केल्यापासून ओमान या देशात पळून गेला होता आणि तिथे एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता.
मात्र, स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या विरोधात तातडीने 'लुक आऊट नोटीस' जारी केली होती. गुरुवारी सकाळी अरबाज ओमानहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच, लुक आऊट नोटीसमुळे विमानतळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले.
( नक्की वाचा : बेडरुममध्ये पतीचा मृतदेह, शेजारी जखमी मुलगा; आरोपी पत्नी बेडवर झोपून पाहत होती रील! वाचा काय आहे प्रकार? )
मैत्री, विश्वासघात आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंगचा कट
या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी अरबाज खान याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या दरम्यान त्याने गुपचुप काही आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले. त्यानंतर अरबाजने हा व्हिडिओ त्याचे मित्र मोईनुद्दीन खान आणि पलालू यांना दिला, इतकेच नव्हे तर त्याने हा व्हिडिओ स्वतःच्या वडिलांनाही दाखवला.
हा व्हिडिओ हाती लागल्यानंतर अरबाज अचानक गायब झाला आणि त्याच्या मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : Pune News: स्लो पॉयझन, कॉन्ट्रॅक्ट किलर आणि जपानी व्हिडिओ ! केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासे )
बापाकडूनही छळाचा प्रयत्न
अरबाज गायब झाल्यानंतर त्याचा मित्र मोईनुद्दीन आणि दुसरा साथीदार पलालू यांनी व्हिडिओच्या जोरावर तरुणीला धमकावून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. अत्यंत घृणास्पद बाब म्हणजे, अरबाजच्या वडिलांनीही या व्हिडिओचा वापर करून पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता.
या छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तपास सुरू केला, ज्यात काही दिवसांपूर्वीच मोईनुद्दीन खान याला अटक करण्यात आली होती. आता मुख्य आरोपी अरबाज खान पोलिसांच्या ताब्यात असून, त्याचे वडील सलीम खान आणि मित्र पलालू यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world