जाहिरात

Dombivli News: कामाची सोय करतो सांगून कुठे घेऊन गेले? डोंबिवलीच्या हतबल मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार!

Dombivli News: या मुलीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तीन जणांनी तिच्यावर सामूहिक दुष्कर्म केले.

Dombivli News: कामाची सोय करतो सांगून कुठे घेऊन गेले? डोंबिवलीच्या हतबल मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार!
Dombivli News: या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
डोंबिवली:

Dombivli News: कौटुंबिक वादानंतर घरातून निघून गेलेल्या एका 16 वर्षीय मुलीला मदतीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघड झाली आहे. घर सोडून आलेल्या या मुलीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तीन जणांनी तिच्यावर सामूहिक दुष्कर्म केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादानंतर ही अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. राहण्यासाठी आसरा आणि खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे ती अत्यंत हवालदिल झाली होती. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी या प्रकरणी अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पोलीस तिचा शोध घेत असतानाच दुसरीकडे तिच्या असहायतेचा फायदा घेण्याचा कट रचला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर कटाई रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही मुलगी जेवणासाठी गेली होती. तिच्याकडे पैसे नसल्याचे पाहून हॉटेल चालक अंगूर ठाकूर याने तिला खायला दिले आणि मदतीचे नाटक करून तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्याने या परिसरातील दोन अल्पवयीन तरुणांशी तिची ओळख करून दिली. मुलीने आपली परिस्थिती सांगितल्यानंतर, तिला काम शोधून देण्याचे आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन या तिघांनी दिले.

( नक्की वाचा : Pune News: कास पठाराची हवा पुण्याच्या पोलिसांना भारी पडली! तपासाच्या नावाखाली केला भलताच पराक्रम )
 

ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते निघाले नराधम

काम आणि निवारा मिळण्याच्या आशेने ही मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवून सोबत गेली. मात्र या तिघांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी या पीडित मुलीला रस्त्यावर सोडून दिले आणि तेथून पोबारा केला. अत्यंत वाईट परिस्थितीत ही मुलगी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली, जिथे स्थानिक नागरिकांनी तिला पाहून तात्काळ पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने आपल्यावर झालेला अत्याचार कथन केला. मानपाडा पोलीस ठाण्यात आधीच तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने कुळगाव बदलापूर पोलिसांनी तातडीने मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: मोबाईल नाही, कॅमेरा नाही... तरीही 'नीट' चा पेपर कसा लीक झाला? CBI तपासात उघड झाली सर्व माहिती )

या प्रकरणातील मुख्य आरोपी अंगूर ठाकूर हा 22 वर्षांचा असून तो हॉटेल चालक आहे, तर इतर दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी अंगूर सिंह याला रीतसर अटक केली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच इतर दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल न्यायालयात करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com