अमजद खान
डोंबिवली स्टेशन बाहेर रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे ॲम्बुलन्स रस्त्यात अडकली असल्याचा व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विट केला होता. त्यानंतर केडीएमसी प्रशासनाला जाग आली आहे. महापालिका प्रशासनाने त्या रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे ॲम्बुलन्स अडकते याची दखल मनसेकडून घेतले जाते. त्यानंतर केडीएमसी कडून कारवाई केली जाते. केडीएमसी अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर याआधी कारवाई का केली नाही? आता परत फेरीवाले या रस्त्यावर बसणार नाही यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांकडे काही उत्तर आहे का ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरातील एका रस्त्याचा मनसेनेते राजू पाटील यांनी व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की कशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसले आहेत. रस्ता अरुंद दिसतोय. या रस्त्यात फेरीवाल्यांमुळे एक ॲम्बुलन्स अडकली आहे. या ॲम्बुलन्समध्ये रुग्ण आहेत. मनसे नेते राजू पाटील यांनी व्हिडिओ ट्वीट करीत सत्ताधाऱ्यांवर आणि केडीएमसीवर साडेतोड टीका केली. मनसे नेते राजू पाटील यांचे म्हणणे होते की, आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला, असं सुरूवातीला त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे. हे सर्व अजून किती दिवस चालणार? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे. त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधींनाल लोकांच्या ‘समस्यांची नाडी' पण पकडता आली पाहिजे. त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे. प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे. बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता. त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले. अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? असं म्हणत त्यांनी #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC असे हॅशटॅग दिले आहेत.
राजू पाटील यांच्या या आरोपानंतर केडीएमसी प्रशासन खळबळून जागे झाले आहे. केडीएमसीचे अधिकारी त्या रस्त्यावर पोहोचले. रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. प्रश्न असा आहे की डोंबिवलीतील हा रस्ता खूप महत्त्वाच्या आहे. या रस्त्यावरून प्रवासी ये जा करतात. या रस्त्यात हॉस्पिटल आहे. फेरीवाल्यांमुळे ॲम्बुलन्स अडकून राहते. एवढेच नाही तर नागरिकांच्या फेरीवाल्यांना धक्का लागला की नागरिकांना मारहाण केली जाते. हे सर्व माहित असताना केडीएमसी अधिकारी आधीक कारवाई का करत नाही असा नागरिकांचा प्रश्न आहे. या फेरीवाल्यांना कोणाचा अभय आहे? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.