डोंबिवलीत 20 वर्षांनी पिंपळेश्वर महादेव मंदिराला मिळाली हक्काची जागा; रवींद्र चव्हाणांकडून पूजन आणि महाआरती

डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी महायुती सरकारने 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करून दोन दशकांपासून प्रलंबित असलेला मंदिरभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोंबिवलीकरांचे आराध्य दैवत आणि हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेचा गेली दोन दशके (20 वर्षे) प्रलंबित असलेला प्रश्न अखेर कायमचा सुटला आहे. महायुती सरकारने या जागृत देवस्थानसाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर केली असून, मंदिरभूमीची मालकी देवस्थानकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे डोंबिवलीकर आणि शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या संकल्पपूर्तीबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंदिरात सपत्नीक उपस्थित राहून विशेष संकल्पपूर्ती पूजन आणि महाआरती केली.

भव्य 'शिवोत्सव' आणि कृतज्ञता सोहळा

मंदिरभूमीचा दीर्घकालीन प्रश्न सुटल्याच्या आनंदात आणि महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार, 8 जून श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात एक भव्य 'शिवोत्सव', भजन-कीर्तन महोत्सव आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेणार आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

2 दशकांचा संघर्ष आणि 'डोंबिवली बंद'ची आठवण

हा विजय सहजासहजी मिळालेला नाही, तर त्यामागे दोन दशकांचा मोठा कायदेशीर आणि सामाजिक संघर्ष आहे, अशी आठवण आमदार रवींद्र चव्हाण यांनी करून दिली. मंदिरभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली 20 वर्षे ग्रामस्थ सभा, विविध खात्यांच्या शासकीय बैठका, कायदेशीर लढा आणि लोकआंदोलनांच्या माध्यमातून हा विषय शासन दरबारी मांडण्यात आला होता.

या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्यासाठी आणि शिवभक्तांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी 20 ऑगस्ट 2012 रोजी भारतीय जनता पक्षाने 'डोंबिवली बंद'ची हाक दिली होती, ज्याला जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या सर्व संघर्षाला आणि शिवभक्तांच्या अथांग श्रद्धेला अखेर महायुती सरकारच्या काळात न्याय मिळाला आहे.

"पिंपळेश्वर मंदिर हा असंख्य शिवभक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. भगवान महादेवाच्या कृपेने आणि जनतेच्या एकजुटीमुळे हा संघर्ष यशस्वी झाला आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समाजात सुख, समृद्धी नांदावी यासाठी या शिवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे," असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

या सोहळ्यात भव्य भजन, कीर्तन, विशेष धार्मिक विधी आणि सामूहिक प्रार्थना होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील सर्व शिवभक्त, ग्रामस्थ आणि नागरिकांनी 8 जून रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article