अमजद खान, कल्याण
डोंबिवली स्टेशन परिसरातील सुशोभीकरणावरुन ठाकरे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची दोन दिवसातच दुरावस्था झाली आहे. गणपतीत जसे डेकोरेशन केले जाते तसे हे सुशोभिकरण करण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर अर्धवट कामाचे भूमीपूजन केले जात असल्याची टीका ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी भाजपवर केली आहे. तर दीपेश म्हात्रे यांचा स्थायी स्वभाव भ्रष्टाचाराचा असल्याने त्यांना सर्व ठिकाणी भ्रष्टाचार दिसत आहे. त्यांनी डोंबिवलीसाठी काय काम केले हे त्यांनी दाखवावे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. भव्य अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्या प्रवेशद्वारावर नाट्यनगरी, नृत्यनगरी असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या समाजासाठी आदर्श आहे त्यांचे फोटो या कमानीवर आहेत. दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी, शशिकांत कांबळे आणि शैलेश धात्रक उपस्थित होता. यावेळी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर देखील उपस्थित होते.
(नक्की वाचा- 'मला एक खून माफ करा' राज ठाकरेंना कोणाचा करायचाय खून? ऐकून तुम्ही म्हणाल...)
नागरिकांनी याका माची प्रशंसा केली आहे. या सुशोभीकरणाच्या कामावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी आज स्टेशन परिसरात कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान कामविषयी प्रश्न उपस्थित करत भाजपला टिकेचे लक्ष्य केले. दीपेश म्हात्रे म्हणाले की, दोन दिवसापूर्वी या कामाचे उद्घाटन केले आहे. त्याची लगेच दुरावस्था झाली आहे. गणपतीला डेकोरेशन केले जाते. तशा प्रकारचे हे सुशोभीकरणाचे काम झाले आहे. काम निकृष्ट दर्जाचे आहे. हे सुशोभीकरण एक प्रकारे डोंबिवलीकरांच्या माथी मारले असल्याची टिका त्यांनी केली.
(नक्की वाचा- ना युती ना आघाडी! राज यांची घोषणा काय? ठाकरेंच्या भाषणातले 5 ठळक मुद्दे)
म्हात्रे यांच्या टिकेला लगेचच भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी म्हटलं की, दीपेश म्हात्रे यांचा स्थायी स्वभाव भ्रष्टाचाराचा आहे. त्यामुळे त्यांना सगळ्याच कामात भ्रष्टाचार दिसतो. डोंबिवलीसाठी त्यांनी काय काम केले हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही म्हात्रे यांना सूर्यवंशी यांनी दिले आहे.