विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमीका काय असेल हेच राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ना आघाड्या ना युत्या. मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. शिवाय निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतला पक्ष असेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या जनतेने एकदा मनसेवर विश्वास ठेवून सत्ता हातात द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. सत्ता हातात दिल्यास उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेची दिशा काय असेल याचेच संकेत दिले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1) लाडकी बहीण योजनेवर सडकून टिका
राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना लडकी बहीण योजनेवर सडकून टिका केली. लाडकी बहीण योजनेतून 1500 रूपये दिले जात आहेत. हे पैसे कुणी मागितले होते का असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या योजनेचे पैसे तीन महिने खात्यात जमा होतील. निवडणूक झाल्यानंतर मात्र हे पैसे मिळणार नाही असे राज म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीत तर सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नसतील. महीलांना फुकट पैसे वाटण्या पेक्षा त्यांना सक्षम बनवा. त्यांच्या हाताला काम द्या. त्यातून त्या पैसे उभे करतील. महीला तेवढ्या सक्षम आहेत. फुकट पैसे कसले देताय असा सवाल त्यांनी सरकारला केला.
2) जेलमध्ये टाकू म्हणणाऱ्यांनी त्यांना मंत्रिमंडळात टाकले
पक्ष फोडीवर ही राज यांनी यावेळी सडकून टिका केली. यावेळी त्यांनी शरद पवारांना लक्ष केले. शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला. पण शरद पवारांनी काय केलं. त्यांना 1978 साली काँग्रेस फोडली. पुढे शिवसेना फोडली. पुढे राणेही फुटले. अशा वेळी कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी पवार करत आहेत असे ही ते म्हणाले. अजित पवार सध्या गुलाबी जॅकेट घालत आहे. त्यांना ते कुणी घालायला सांगितले माहित नाही. अशा लोकांना भाजप कसे स्विकारतो हा प्रश्न आहे. ते सत्ते येण्या आधी पंतप्रधान मोदी म्हणाले होते घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार. जेलमध्ये टाकण्या ऐवजी त्यांना सत्तेत टाकण्यात आलं अशी टिका राज यांनी केली. हे का होत आहे तर तुम्हाला गृहीत धरलं जात आहे म्हणून असेही राज यांनी स्पष्ट केले.
3) मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही
मराठा आरक्षणावरही राज यांनी स्पष्ट भूमीका मांडली. सध्याच्या स्थिती मराठा आरक्षण मिळणे कठीण आहे. ते मिळू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही आरक्षण दिले. पण आरक्षण देण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही. त्यासाठी घटना बदलावी लागेल. तसे झाले तर इतर राज्यातील जातीही आरक्षणासाठी पुढे येतील. त्यातून अनेक अडचणी निर्माण होवू शकतात. तामिळनाडून तसा प्रयत्न केला होता. मात्र ती केस अजूनही कोर्टात आहे. शिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना माहित आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापवला जात आहे. निवडणुका झाल्यानंतर हा मुद्दा मागे पडेल. मराठा आरक्षण मिळू शकत नाही हे सर्वांना माहित आहे. पण ते बोलण्याचे धाडस या राज ठाकरेने केले आहे असेही ते यावेळी म्हणाले. मराठा आरक्षण दिले पाहीजे असे सर्व नेते म्हणत होते. मग त्यांना अडवलं कुणी आहे अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.
4) मनसेची सत्ता आल्यास प्रत्येकाला रोजगार
मी जे बोलतो ते करून दाखवतो. जे शक्य आहेत तोच शब्द देतो. मनसेला एकदा सत्ता द्या. राज्यातला एकही तरूण किंवा तरूणी कामा शिवाय राहाणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम दिले जाईल. हे काम देताना जातीपाती प्रमाणे दिले जाणार नाही. असेही त्यांनी सांगितले. राज्यात जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात कसे येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातून अनेक रोजगार निर्माण होवू शकतात. सध्या लाडकी बहीणीला पैसे दिले जात आहेत. ही सवय सरकार लावत आहे. त्यातून ही सवय लागले. त्याचे परिणाम वाईट होतील. शेतकरी मोफत वीज मागत नाही. पण त्याला मुबलक आणि वेळेत वीज द्या ही त्याची मागणी असल्याचे राज म्हणाले. जर योजनांतून पैसे देण्याची सवय लागली तर हा महाराष्ट्र वेगळ्या मार्गावर जाईल. सर्वच पक्षांना तसे करावे लागेल असेही ते म्हणाले.
5) मनसे सत्तेतला पक्ष बनणार
भाषणाच्या शेवटी राज यांनी जोरदार बॅटींग केली. या विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल. हे लोक पैसे वाटतली. त्यावेळी पैसे घ्या. हे पैसे तुमचेच आहेत. तुमच्याकडूनच त्यांनी लुटले आहेत. त्यामुळे पैशाला नाही म्हणून नका. मात्र पैसे घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे ना युती ना आघाडी असे जाहीर करत मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. शिवाय निकालानंतर मनसे हा सत्तेला पक्ष असेल हे सर्वांनी लक्षात ठेवावे असं ही ते म्हणाले. आपण सर्व जण मिळून उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. त्यासाठी राज्याची धुरा आमच्या हातात द्या असेही आवाहन त्यांनी राज्यातल्या मतदारांना केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world