Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण

KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन महिला नर्सना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधींच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन नर्सना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही पकडून ठेवल्याचा आरोप आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून, "आमच्यावर आणखी किती अन्याय करणार?" अशी संतप्त आणि आर्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

नेमका वाद कशामुळे झाला?

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली की, जन्मानंतर बाळाला 'एनआयसीयू' (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) उपचारांची आवश्यकता भासू शकते.

Advertisement

बेड्स रिकामे नसल्यामुळे वाद

मात्र, शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स आधीच भरलेले असल्याने, बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला. याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर पुढे थेट डॉक्टर आणि नर्सवरील शारीरिक हल्ल्यात झाले.

(नक्की वाचा-  Ketan Agrawal Case: सियाचं 4 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न? पोलीसची चक्रावले, तपासात काय आलं समोर?)

"शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बेड्स उपलब्ध नसताना डॉक्टरांनी रुग्णाच्या चांगल्यासाठीच दुसरा सल्ला दिला होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असा हल्ला खपवून घेतला जाणार नाही," अशी प्रतिक्रिया मुख्य आरोग्य अधिकारी सादिया पिंजारी यांनी दिली.

डॉक्टर-कर्मचाऱ्यांचं रुग्णालयात कामबंद आंदोलन

या धक्कादायक घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने 'कामबंद आंदोलन' सुरू केले आहे. "यापूर्वीही अनेकदा डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील नर्ससोबत अशा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. अशा असुरक्षित वातावरणात डॉक्टरांची काम करण्याची मनस्थिती राहिलेली नाही," अशी उद्विग्न भावना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(नक्की वाचा-  Video Viral: मुलं किंचाळत होती, महिलेने हात जोडले, तरी दया आली नाही, टोळक्याचा कार चालकावर हल्ला, कारण...)

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला आणि वैद्यकीय सेवा व्यक्ती संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 

Topics mentioned in this article