देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News Latest : रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. श्री सदस्यांनी नीरा शहरातही स्वच्छता अभियानाची पाळेमुळे रोवली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा स्थळापासून सुरू झालेल्या या महास्वच्छता अभियानात शेकडो श्री सदस्यांनी या अभियानात सहभाग घेतला. तब्बल 7.50 टन कचरा गोळा करून या श्री सदस्यांनी शहराला नवसंजीवनी दिली. पहाटेच्या शांत वातावरणात श्री सदस्यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला. काही तासांतच
अस्वच्छतेचे चित्र स्वच्छतेच्या तेजस्वी रूपात बदलले.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 104 व्या जयंती निमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला नीरा येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री समर्थ बैठक नीरा व श्री समर्थ बैठक वडगाव निंबाळकर येथील 230 श्री सदस्य सकाळी सात वाजता नीरा नदीकाठावरील पालखी विसावा स्थळी एकत्र जमले. हातात खराटे,फावडे,कोयते,दातुळ,घमेले आणि पाट्या घेऊन सज्ज असलेल्या सदस्यांनी आज्ञा मिळताच विविध भागांकडे धाव घेतली. एका गटाने स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला तर दुसऱ्या गटाने नीरा नदी पुलालगतच्या महादेव घाटावर साचलेला कचरा हटवला. हनुमान मंदिर परिसर,आठवडे बाजार,जैन मंदिर परिसर,पोलीस दुरक्षेत्र, बाजारपेठेतील मोकळ्या जागा आणि सार्वजनिक स्थळांवरही स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविण्यात आली.
नक्की वाचा >> US-Israel Iran War: दुबईतील 'या' शहरात अडकले मुंबई, पुणे, कोल्हापुरातील विद्यार्थी, थक्क करणारा फोटो आला समोर
समाजसेवेचा प्रेरणादायी संदेशही मिळाला
नीरा ग्रामपंचायत प्रशासनाने या अभियानासाठी 2 घंटागाड्यांची तर 4 खाजगी वाहनातून गोळा झालेला कचरा त्वरित डंपिंग ग्राऊंडवर पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांना हातमोजे,मास्क,खराटे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात आली. गुळूंचे, कर्नलवाडी, राख, पिंपरे खुर्द,पिसुर्टी,मांडकी,जेऊर,निंबूत,वाणेवाडी (मळशी),वाघळवाडी,सोमेश्वर,वडगाव निंबाळकर, होळ आदी गावांमधून आलेल्या श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सकाळी सात ते दहा या तीन तासांत शहरातील अनेक भाग स्वच्छतेने उजळून निघाले.या महास्वच्छता अभियानामुळे नीरा शहराला केवळ स्वच्छतेचा नवा चेहराच मिळाला नाही, तर समाजसेवेचा प्रेरणादायी संदेशही मिळाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world