राहुल कुलकर्णी, पुणे
दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज ही घोषणा झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नक्की कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधींची आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी झालेल्या बैठकीत तारखा निश्चित करणे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषा याबाबतही चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाची शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर आणि रविवार दिनांक 6 ऑक्टोबर अशी दोन दिवसीय बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . या सर्व संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी झालेल्या नावांच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती. यापूर्वी 1954 मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषवले होते.
आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. महामंडळाची बैठक टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाली . शनिवारच्या बैठकीत संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, ग्रंथ दालनाचे नियोजन आदींवर चर्चा करण्यात आली आणि आजच्या बैठकीत ही रूपरेषा अंतिम करून संमेलनाध्यक्षांची निवड घोषित करण्यात आली .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world