जाहिरात

मराठी साहित्यासाठी मोदी-पवार दिल्लीत एकत्र येणार, पंतप्रधानांनी स्वीकारलं आमंत्रण

Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.  

मराठी साहित्यासाठी मोदी-पवार दिल्लीत एकत्र येणार, पंतप्रधानांनी स्वीकारलं आमंत्रण
मुंबई:

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.  21 फेब्रुवारी 2025 रोजी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी करावं अशी विनंती पवारांनी केली होती. पंतप्रधान कार्यालयानं ही विनंती स्विकाल्याचं जाहीर केलं आहे.त्यामुळे दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पवार आणि मोदी एकत्र येणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच साहित्य संमेलन आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारातही मोदींनी हा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला होता.  

70 वर्षांनी दिल्लीत संमेलन

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये तब्बल 70 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी 1954 रोजी हे साहित्य संमेलन झालं होतं. तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेते काकासाहेब गाडगीळ त्या साहित्य संमेलनाचे स्वाताध्यक्ष होते. तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी त्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं. नेहरुंनंतर मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील.

( नक्की वाचा : काय असतो अभिजात भाषा ठरण्याचा निकष? कोणत्या निकषावर मिळाला मराठीला बहुमान ? )
 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे.बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या सर्व संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी झालेल्या नावांच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर तारा भवाळकर यांच्या नावावर  शिक्कामोर्तब करण्यात आले.

यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर यांची नावं चर्चेत होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: