Mumbai News: खजूरमधून कोकेनची तस्करी! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 21.78 कोटींचे कोकेन जप्त

कोकेनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी अवलंबलेली पद्धत अत्यंत चाणाक्ष आणि धक्कादायक होती. तस्करांनी खजूरच्या बिया काढून टाकल्या आणि त्या जागी अत्यंत सफाईने कोकेन भरले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) एका मोठ्या आणि धक्कादायक तस्करीचा पर्दाफाश केला आहे. खजूर फळांमध्ये कोकेन लपवून त्याची तस्करी करण्याचा हा प्रयत्न होता. डी.आर.आय.ने कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 21.78 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे.

खजूरच्या बिया काढून केली होती तस्करी

कोकेनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी अवलंबलेली पद्धत अत्यंत चाणाक्ष आणि धक्कादायक होती. तस्करांनी खजूरच्या बिया काढून टाकल्या आणि त्या जागी अत्यंत सफाईने कोकेन भरले होते. डी.आर.आय.ने केलेल्या तपासणीत तब्बल 2.178 किलो वजनाची पांढरी पावडर जप्त करण्यात आली, जी तपासणीनंतर कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशासह 2 जणांना अटक

डी.आर.आय.च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सिएरा लिओन या आफ्रिकेतील देशातून आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे, जो कोकेन घेऊन आला होता. तसेच, विमानतळावर कोकेनची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या एका इसमाला देखील अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. डी.आर.आय.च्या या यशस्वी कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांचे मुंबईला ट्रान्झिट पॉईंट बनवण्याचे मोठे षडयंत्र उधळले गेले आहे. विशेषत: खाद्यपदार्थांमध्ये अंमली पदार्थ लपवण्याची ही नवी आणि धोकादायक पद्धत समोर आली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article