रामराजे निंबाळकर, नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार सध्या 'नॉट रिचेबल' आहेत. हे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या संभाव्य पक्षांतरासाठी शिवसेनेकडून पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील या वेगवान घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे हे स्वतः रात्रीच दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे.
जयपूर ते दिल्ली गुप्त बैठकांचे सत्र
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजस्थान (जयपूर) गाठले. तिथे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान त्यांनी लोकसभेत नवीन स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत प्राथमिक पत्र दिल्याचे समजते. यानंतर शिंदे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या 'नॉट रिचेबल' खासदारांमध्ये एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी हे 6 खासदार आधी लोकसभेत आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. त्यानंतर, हा स्वतंत्र गट एकनाथ शिंदे यांच्या मुख्य शिवसेनेत विलीन केला जाईल.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
19 जूनला पक्षप्रवेश?
आगामी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच मुहूर्तावर या खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश घडवून आणण्याची तयारी शिंदे गटाने केल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर
आपले 6 खासदार पक्षाच्या संपर्कात नसल्याचे समजताच ठाकरे गटात प्रचंड खळबळ उडाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तातडीने ॲक्शन मोडवर आले आहेत. एकनाथ शिंदेंचे हे 'ऑपरेशन टायगर' अपयशी ठरवण्यासाठी ठाकरे गटाने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी तातडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, "ठाकरे गटातून फुटू पाहणाऱ्या किंवा पक्षादेश डावलणाऱ्या कोणत्याही संभाव्य फुटीर गटाला लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून कोणतीही वेगळी मान्यता देऊ नये." या कायदेशीर पत्रा पत्रामुळे आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जर हे 6 खासदार फुटण्यात यशस्वी झाले, तर ठाकरे गटासाठी हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जाईल.