Mumbai News : आगामी निवडणुका लक्षात घेता, बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधीच 'मत चोरी'चा आरोप केला होता. मात्र आता खुद्द शिवसेना शिंदे गटाला देखील बोगस मतदारांचा धसका बसल्याचे दिसत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपद्वारे मतदार यादीतील प्रत्येक बोगस मतदारावर बारीक नजर ठेवली जाणार आहे.
या ॲपचा मुख्य उद्देश मतदार यादीतील घोळ शोधून काढणे हा आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील मतदारांचे पत्ते, नावे आणि त्यांची नोंदणी तपासली जाईल. तसेच, एकाच पत्त्यावर जास्त मतदार नोंदणी केली आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे. शिंदे गटाला अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी बोगस इमारतींचे पत्ते दाखवून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार उभे करण्यात आले आहेत. या ॲपच्या मदतीने अशा बनावट मतदारांना शोधून काढणे सोपे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा- Trump Tariff : अमेरिकेच्या त्रासावर रशियाची गोळी, भारताला मिळाली खास ऑफर! अर्थव्यवस्थेचं टेन्शन होणार दूर)
या डिजिटल रणनीतीचा एक भाग म्हणून, शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना पुढील 15 दिवसांत जास्तीत जास्त सक्रिय सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणीवरही भर देण्यास सांगितले आहे. या मोहिमेमुळे केवळ बोगस मतदारांना शोधून काढणेच नव्हे, तर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे हा देखील शिंदे गटाचा उद्देश आहे.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
हे ॲप यशस्वी करण्यासाठी एक विशेष रचना तयार करण्यात आली आहे. यात मोहीम व्यवस्थापक, बूथ सर्वे प्रमुख, सहयोगी बूथ सर्वे प्रमुख, सर्वेक्षक आणि निरीक्षक अशा पाच स्तरांवर काम चालणार आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बूथ स्तरावर प्रत्येक मतदाराची तपासणी केली जाईल. हा अभिनव प्रयोग जर यशस्वी झाला, तर आगामी काळात निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.