अविनाश पवार, पुणे
Pune News : महायुती सरकारमधील काही मंत्री भ्रष्टाचार, वादग्रस्त तसेच असंवेदनशील वक्तव्ये यामुळे अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षाकडून या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. अशात विद्यमान मंत्र्यांवर टांगती तलवार असताना इतर नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव अचानक पुन्हा मंत्रिमंडळासाठी चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
गेल्या काही काळापासून तानाजी सावंत हे राजकीय अज्ञातवासात होते. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते गेल्या नऊ महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही केवळ सदिच्छा भेट होती की सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे, याबाबत चर्चा सुरू आहेत.
(नक्की वाचा- Govt Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरासाठी मार्गदर्शक सूचना जारी; काय आहेत नियम?)
सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्याने सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्या नेत्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही भेट सावंत यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असेही बोलले जात आहे.
दुसरीकडे, तानाजी सावंत यांच्यावरील आधीचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांचे भडक बोलणे यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री त्यांच्या नाराजीवर फुंकर घालण्यासाठी गेले होते की खरंच त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा विचार सुरू आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
(नक्की वाचा -Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या भाच्याच्या घरी अजित पवारांचे स्नेहभोजन अन् बंद दाराआड चर्चा, मामाच्या पोटात गोळा)
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र राजकारणात सदिच्छा भेटीला देखील अर्थ असतात, त्यामुळे याचा उलगडा देखील येत्या काळात नक्कीच होईल.