रिजवान शेख, प्रतिनिधी
Electric EV vehicle charging rates increase : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधन बचतीचं आवाहन केलं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी देशात पेट्रोलच्या किमतीत तब्बल ३ रुपयांनी वाढ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आवाहनात इलेक्टिक कारचा वापर करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. इलेक्ट्रिक कार चालकांना टोल द्यावा लागत नाही. त्याशिवाय यासाठी इंधनची आवश्यकता नसते. त्यामुळे इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक कार हा चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इलेक्ट्रिक कार चालकांना पैसे बचतीचा आनंद फार काळ घेता येणार नाही.
इलेक्ट्रिक कार चालकानांही फटका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचं आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी राज्यभरामध्ये वाढताना दिसून येत आहे. मुंबई येथील मंत्रालयाजवळ दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. मात्र राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीचं चार्जिंक स्टेशन पुरेसे नाहीत, जवळ चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापूर्वी इलेक्ट्रिक गाड्यांचे एक पॉईंट चार्ज करण्यासाठी ५ रुपये आकारले जात होते. पण आता त्यात वाढ होऊन ६.३० रुपये झाले आहेत. याचा अर्थ इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी दीड रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मुंबई सारख्या शहरांमध्ये खूप कमी ठिकाणी इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्यामुळे कार चालकांना गाडी चार्ज करण्यासाठी वणवण करावी लागते.
इलेक्टिक कार चार्जिंगसाठी किती पैसे आकारले जातात?
सर्वसाधारणपणे, काही इलेक्ट्रिक कार एकदा केलेल्या चार्जिंगवर १२० किलोमीटर धावतात. याच्या आधारावर १२० किलोमीटर धावण्यासाठी या कारमध्ये १२० पॉइंट्स असतात. यातील एका पॉइंटसाठी आतापर्यंत पाच रुपये आकारले जात होते. मात्र आता यात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ जी गाडी चार्ज करण्यासाठी १२० पॉइंट्सनुसार, ३५० रुपये आकारले जात होते, त्याच गाडीसाठी आता तितच्या पॉइंट्ससाठी ४५० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार चालवित असणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.