विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व राजकीय ड्रामानंतर आता कोकणातील राजकारणाला एक नवीन आणि मोठे वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ऐनवेळी नाट्यमयरीत्या अर्ज मागे घेणारे नेते बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बाळ माने हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर बाळ माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे सेनेत प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांची पावले पुन्हा भाजपच्या दिशेने पडू लागली आहेत. विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेताना त्यांच्यासोबत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित होते. अर्ज माघारीनंतर ते थेट राणेंसोबत मुंबईला रवाना झाले असून, तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाल्याचे समजते. आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजप कोकणात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बाळ माने यांच्यावर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
"माघार पराभवाच्या भीतीने नाही, तर यशस्वी रणनीतीचा भाग"
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी NDTV मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. "महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली होती, पण आमच्याकडे केवळ 55 मतदार होते. मला कुणी सूचक म्हणून सही देखील दिली नाही. जर मी निवडणूक लढवली असती आणि माझा पराभव झाला असता, तर मीडियानेच माझा 'दारूण पराभव' झाल्याची बातमी चालवली असती. त्यामुळे दोन पावले मागे घेऊन घेतलेली ही यशस्वी माघार आहे. राजकारणात मोठं व्हायचं असेल तर दोन पावलं मागे येणे यात गैर नाही. मी या निर्णयाची पूर्वकल्पना माझ्या पक्षाच्या नेत्यांना दिली होती", असं बाळ माने यांनी म्हटलं.
EXCLUSIVE मुलाखत
मी निवडून येणार नव्हतोच. मात्र माघार घेतली तर याला यशस्वी माघार म्हणायचं नाही का? बेईमानी आणि गद्दारी असे शब्द लगेच त्याला जोडायचे. यांना बेईमानी नेहमी दिसते. मात्र हे प्रत्येक वेळी डील करतात. पालघर लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत साहेबांनी ठाकरे गटाच्या खासदार यांचा पराभव व्हावा म्हणून काही नेत्यांसोबत सेटलमेंट केली, असा आरोप देखील बाळ माने यांनी केला.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: महिलेने यात्रेत चादर खरेदी केली अन् घरी नेली, घडी उलगडताच धक्का बसला; VIDEO शेअर करत म्हणाली)
विनायक राऊतांवर 'सुपारी' घेतल्याचा थेट आरोप
पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. संजय राऊतांनी लावलेले घोडेबाजाराचे आणि पैसे घेतल्याचे सर्व आरोप फेटाळत माने यांनी आव्हान दिले की, "हे आरोप सिद्ध करा, मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन."
विनायक राऊत यांच्यावर घणाघाती आरोप
मातोश्रीशी बेईमानी करणारे खरे व्यक्ती विनायक राऊत आहेत. ते सातत्याने उद्धव ठाकरे यांना गैरसमजात ठेवतात आणि चुकीची माहिती देऊन कान भरतात. मी जेव्हा पक्षात येत होतो, तेव्हा माझ्या प्रवेशात विनायक राऊत यांच्या 'हरामखोरी' मुळेच उशीर झाला होता. उद्धवजींनी त्यांचे ऐकले नाही म्हणून माझा प्रवेश झाला, असंही बाळ माने यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
नेमणूक पत्रासाठी पैसे
"नारायण राणे आणि गणेश नाईक यांसारखे मोठे नेते जेव्हा पक्ष सोडून गेले, तेव्हा विनायक राऊत यांनी सहानुभूती मिळवून पक्षात स्थान मिळवले. साध्या कार्यकर्त्याला नेमणूक पत्र द्यायचे असेल, तरी विनायक राऊत 50 हजार रुपये घेतात. पालघर लोकसभा असो की स्थानिक निवडणुका, राऊतांनी नेहमी पक्षाच्या विरोधात काम केले. माझ्या सुनेला नगरपालिकेत तिकीट मिळू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शिवसेना संपवण्याची सुपारी विनायक राऊतांनीच घेतली आहे, असा आरोपी माने यांनी केला.