राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील यांना देखील महायुतीत सामील होण्याची ऑफर होती. राज्य सरकारमध्ये जयंत पाटलांसाठी मंत्रिपद राखून ठेवल्याचंही बोललं जात होतं. मात्र आता खुद्द जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. मला शपथविधीला येण्याची अजित पवारांनी विनंती केली होती, पण मी गेलो नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 'NDTV मराठी'च्या 'या सरकार'या विशेष कार्यक्रमात जयंत पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जयंत पाटील यांनी म्हटलं की, अजित पवारांनी माझ्यासाठी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवली होती, हे खरं होत. मी त्यांना सल्ला दिला होता, शरद पवारांना न विचारता काहीही करू नका. जेव्हा अजित पवार पक्ष फोडून तिकडे गेले, तेव्हा पुन्हा त्यांनी चूक दुरुस्त करावी यासाठी मी प्रयत्न करत होतो. आमच्या मिटींग देखील झाल्या होत्या. अजित पवारांनी राजभवनावरून मला फोन केला. मला शपथविधीला येण्याची अजित पवारांनी विनंती केली. पण मी गेलो नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले
अजित पवारांचा भाजपला मोठा तोटा
अजित पवारांच्या डोक्यावरती सिंचनाच्या चौकशीचं भूत आहेच. त्यात त्यांना आर आर पाटील यांची आठवण झाली. अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही ते सत्तेच्या जवळ गेले म्हणून तात्पुरता आधार मिळाला. अजित पवार महायुतीसोबत गेले, मात्र अजित पवारांचा भाजपला मोठा तोटा झाला, अशी टीका देखील जयंत पाटलांनी केली.
सत्तेची चावी बंडखोरांच्या हातात राहील असं वाटत नाही. महाविकास आघाडीला 170-175 जागा मिळू शकतील. मोदींच्या सभेत समोर खुर्च्या टाकल्या तेवढ्या माणसं नाहीत. मैदान मोकळं आहे. त्यामुळे त्यांना शपथविधी आठवला असेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लागावला.
25 नोव्हेंबरला शपथविधी होऊ शकतो
विधानसभा निवडणुकीनंतर 26 तारखेपर्यंत सरकार अस्तित्वात आलं पाहीजे. भाजपचं तोडफोड करण्यात मोठं नुकसान झालं आहे. भाजपला थांबवण्याशिवाय गत्यंतर नाही. 23 तारखेला निकाल लागेल 24 तारखेला सर्वजण बसून निर्णय घेऊ. त्यानंतर 25 तारखेला शपथविधी होऊ शकतो, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
महायुती सरकारवर निशाणा
महाराष्ट्राचं सध्याचं भ्रष्टाचारी सरकार जायला पाहिजे. महाराष्ट्रानं गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारायचं नसेल तर महाविकास आघाडीला मतदान करावं, असं माझे जनतेला आवाहन आहे. महाविकास आघाडीचं सरकार येईल असा आमचा विश्वास आहे.शेतमालाला दर नाही, हा सध्याच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे. कायदा सुव्यवस्था राखता आली नाही. महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. गुंडाराज सुरू आहे. नैसर्गिक संकट आलं तेव्हा सरकारनं घोषणा केल्या पण मदत पोहोचली नाही, असं बोलत जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.