वॉर्डबॉय बनला बोगस 'डॉक्टर'! चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; वाशीतील धक्कादायक प्रकार

Navi Mumbai News: वॉर्डबॉयने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नवी मुंबईतील वाशी येथे 5 फेब्रुवारी रोजी घडली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

वॉर्डबॉयचा 'डॉक्टर' म्हणून वावर

आरोपी संदेश पाष्टे हा मूळचा मानखुर्दचा रहिवासी असून तो अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये केवळ वॉर्डबॉय म्हणून काम करतो. मात्र, मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात तो स्वतःची ओळख 'डॉक्टर' म्हणून करून द्यायचा आणि रुग्णांवर उपचार करायचा.

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापूरकरांची लूट थांबवा! भाजप नेत्यांची RTO कडे मोठी मागणी)

नेमकी घटना काय?

प्रचितीला हार्मोनल आजार असल्याने तिच्या वडिलांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला उपचारासाठी घरी बोलावले होते. 5 फेब्रुवारी रोजी पाष्टेने घरी येऊन प्रचितीला पहिले इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने त्याने पुन्हा दुसरे इंजेक्शन टोचले. दुसऱ्या इंजेक्शननंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती प्रचंड खालावली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने या उपचारासाठी कुटुंबाकडून चक्क 15 हजार रुपये फी उकळली होती. तर प्रत्यक्षात अशा इंजेक्शनची किंमत 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान असते.

(नक्की वाचा-  Dombivali News : ठाणे-डोंबिवलीतील मानकोली उड्डाणपुलावर नागरिकांच्या जीवाशी खेळ; भाजप नेत्याने शेअर केला Video)

आरोपीला बेड्या

मुलीचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने वडील भिकुराम भुवड यांनी तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी  6 फेब्रुवारी रोजी आरोपीला बेड्या ठोकल्या. प्रचितीला नेमकी कोणती औषधे टोचण्यात आली, याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता आणि पदवीची शहानिशा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article