अविनाश पवार, प्रतिनिधी
Junnar Gold Mango Viral Story : “अशक्य” हा शब्द आपल्या शब्दकोशात नसतो,हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी..कोकण म्हणजे आंब्याचं माहेरघर अशी ओळख असताना,घाटमाथ्यावरील जुन्नरमध्ये त्यांनी विकसित केलेला “जुन्नर गोल्ड”हा विशेष आंबा वाण आता राज्यभरातील आंबा रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे.
जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील भरत जाधव गेली अनेक वर्षे आंबा फळपीक क्षेत्रात प्रयोग करत आहेत.विविध आंबा वाणांची कलमे लावून,त्यांचे गुणधर्म अभ्यासून आणि स्थानिक हवामानाशी सुसंगत वाण विकसित करण्याच्या प्रयत्नातून “जुन्नर गोल्ड” या नव्या आंबा वाणाचा जन्म झाला.चव,रंग,आकार आणि गुणवत्तेमुळे हा आंबा इतर वाणांपेक्षा वेगळा ठरत असल्याचं सांगितलं जात आहे.
हापूस,केशर आणि राजापुरी या लोकप्रिय आंबा वाणांची वैशिष्ट्ये “जुन्नर गोल्ड”मध्ये दिसून येतात.राजापुरीसारखा मोठा आकार,आकर्षक केशरी रंग,गोडसर आणि वेगळी चव तसेच दरवर्षी नियमित फळधारणा ही या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जात आहेत.घाटमाथ्याच्या हवामानात तयार झालेल्या या आंब्याची चव कोकणातील आंब्यांपेक्षाही वेगळी आणि खास असल्याचं आंबाप्रेमी सांगत आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत..इंदापूरच्या ओंकारने सायकलवरून चक्क केदारनाथ गाठलं, थक्क करणारा Video
आंब्याच्या उत्पादनातही मिळतो मोठा नफा
विशेष म्हणजे या वाणाला “शेतकरी वाण”म्हणून मान्यता मिळाल्याने भरत जाधव यांच्या प्रयोगशीलतेची अधिकृत दखल घेण्यात आली आहे.नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने यासाठी पुढाकार घेत संबंधित प्रक्रियेत मदत केली.त्यानंतर या वाणाला अधिकृत मान्यता आणि कायदेशीर हक्क प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
भरत जाधव यांच्या माहितीनुसार,जुन्नरच्या मातीत आणि हवामानात आंबा उत्पादनाला मोठी क्षमता आहे. भाजीपाला किंवा ऊस पिकांच्या तुलनेत आंबा फळपिकामध्ये दीर्घकालीन अधिक नफा मिळू शकतो. एकदा झाड मोठं झाल्यानंतर योग्य व्यवस्थापन केल्यास अनेक वर्षे उत्पादन मिळत राहतं.मात्र,बुरशीजन्य रोग,फळकुज आणि विविध कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> Pune News : पुण्याच्या मुळा नदीच्या किनारी थरकाप उडवणारी घटना, मित्रांसोबत पार्टी करताना तरुणासोबत घडलं भयंकर
जुन्नरचाही आंबा राज्याच्या बाजारपेठेत
यंदाच्या हंगामात काही प्रमाणात उत्पादन घटलं असलं तरी आंबा शेतीमध्ये संयम आणि सातत्य महत्त्वाचं असल्याचं भरत जाधव मानतात.“एका हंगामात नुकसान झालं तरी पुढील हंगामात भरपाई मिळू शकते,”हे शेतीचं गमक त्यांनी ओळखलं असून त्याच जिद्दीने ते आंबा शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.
आता भरत जाधव “जुन्नर गोल्ड”या वाणाची कलमे तयार करून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जुन्नर परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा नवा आर्थिक पर्याय ठरू शकतो.कोकणानंतर आता जुन्नरचाही आंबा राज्याच्या बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार का,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.“जुन्नर गोल्ड”च्या माध्यमातून स्थानिक शेतीला नवी दिशा,प्रयोगशील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि ग्रामीण भागातील फळपीक शेतीला नवा आत्मविश्वास मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world