Chhatrapati Sambhajinagar : शेतीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोरच शेतकऱ्यांना विहिरीती उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खादगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
संजय शेषेराव कोहकडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांसमोर संजय यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय कोहकडे यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता, कारण दोन्ही बाजूला नाल्यांचे खोदकाम करण्यात आले होते. यामुळे शेतात पाणी साचू लागले होते आणि पिकांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत त्यांनी अनेक वेळा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी झापल्याने घेतला टोकाचा निर्णय
मंगळवारी महसूल अधिकारी त्यांच्या शेतात नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यावेळी कोहकडे यांनी आपली व्यथा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांसमोर मांडली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच उलट झापले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कोहकडे यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली आणि अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली. काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.