Navi Mumbai APMC : नवी मुंबई APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, दरकपातीचा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच उघड

शेतकरी बांधव आपला कष्टाने पिकवलेला माल घेऊन नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये मोठ्या आशेने येतात. मात्र येथे त्यांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

Navi Mumbai News : राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात आहे. कित्येक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीपूर्वी पिक काढलंय. शेतकरी बांधव आपला कष्टाने पिकवलेला माल घेऊन नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये मोठ्या आशेने येतात. योग्य दर मिळेल, घामाचा पैसा वाया जाणार नाही या अपेक्षेने शेतकरी बाजारात येतात. परंतु येथे त्यांची अक्षरशः लूट होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. (Farmers loot in Navi Mumbai APMC market )

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये नियमनमुक्त भाजीपाला आणि फळांचा व्यापार होत असतानाही पारदर्शक लिलाव प्रणाली राबवली जात नाही. त्याऐवजी व्यापारी संगनमताने गुप्तपणे व्यवहार करतात. संपूर्ण विक्री "टॉवेल" किंवा "गमजा" पद्धतीMPने म्हणजे फडक्यात हात घालून केली जाते असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वतः उपस्थित असला, तरी त्याला आपल्या मालाचा नेमका दर किती ठरला हे कळतच नाही.

नक्की वाचा - Maharashtra Rain : आभाळ फाटलं, शेती पाण्याखाली; महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा

प्रत्यक्षात ड्रॅगन फळ 150 ते 160 रुपये किलो दराने विकले गेले. तरी व्यापारी शेतकऱ्याला फक्त 80 ते 90 रुपये किलो दर दाखवण्यात आला. उर्वरित नफा व्यापाऱ्यांच्या खिशात. या संगनमतामुळे शेतकऱ्यांना 60 ते 70 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Advertisement

याबाबत शेतकरी विचारणा करताच, "पावसामुळे दर पडलेत", "आवक वाढली आहे", "फळांची साईज वेगळी आहे" अशा कारणांची बडबड व्यापाऱ्यांकडून केली जाते. जर एखादा व्यापारी शेतकऱ्याला थोडा जास्त दर देण्याचा प्रयत्न करतो, तर इतर व्यापारी मिळून त्याच्यावर दबाव टाकतात आणि पुढे त्याला कमी दर देण्यास भाग पाडत असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर जर शेतकऱ्याने आवाज उठवला, तर व्यापारी वाहतूकदारांना सूचित करून त्याचा मालच उतरवून घेत नाहीत. परिणामी शेतकऱ्याचा दुहेरी तोटा होतो.

या संपूर्ण प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, वाशी एपीएमसीमध्ये पारदर्शक निलाव प्रणालीची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास संपुष्टात येईल आणि थेट संघर्ष उभा राहील. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काय कार्यवाही करतात, याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article