
Maharashtra Rain Alert : सप्टेंबर महिना संपत आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जून-जुलैसारखा पाऊस कोसळत आहे. मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना आज 23 सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आज 23 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील तीन तासांत अहमदनगर, नाशिक, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुंबईलाही यल्लो अलर्ट देण्यात आला असून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उपनगरात मात्र रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असू आजही पाऊस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदाजानुसार मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात वादळ आणि जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - School Holiday : राज्यात पावसामुळे दाणादाण, 3 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात आधीच अविरत पाऊस पडत आहे आणि ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकांची काढणी करावी अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांना रेस्क्यू करताना...
पावसामुळे शेतीचं नुकसान...
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी कापूस वाडगाव- लाडगाव गावचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्या आहेत. कापूस, मक्का, भुईमूग, अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावली आहे. भूम परंडा कळंब धाराशिव वाशी तालुक्यात पावसाचा हैदोस पाहायला मिळत आहे. आंबी येथे नदीला आलेल्या पुरात चक्क वाहन वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली असून शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.
मागील तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती आणि शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्ह्यातील वडगाव जहागीर शिवारातील एका शेतीमध्ये पाणी साठून बांध फुटल्याने अक्षरशहा ओढ्याचं स्वरूप प्राप्त झाल आहे. या होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला असून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरात काल रात्री झालेल्या पावसाने शेतामध्ये अक्षरशः पाण्याचे तळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या सारोळाबद्दी गाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कमरे इतके पाणी साचले आहे. साडेआठ एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन आणि कांदा पिक नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world