FDA Tukaram Mundhe big decision : तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आल्यापासून सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. आता तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील शाळांमधील उपाहारगृह आणि परिसरात विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर करडी नजर असणार आहे. यापुढे शाळेतील कॅन्टिन आणि शाळेच्या ५० मीटरच्या परिसरात हाय फॅट, ट्रान्स फॅट, जास्त मीठ, साखरयुक्त पदार्थांची जाहिरात, वितरण, मोफत विक्री किंवा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आज तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली.
महाराष्ट्रात १ लाख ८ हजार शाळा आहेत आणि त्यात २ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. सध्या लहान वयातच मुलांना अनेक लाइफस्टाइलसंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. त्यात वाढलेलं वजन, मधुमेहाचाही समावेश आहे. त्यामुळे शालेय पातळीपासून लहान मुलांना पौष्टिक अन्न दिलं तर त्यांची बौद्धिक आणि शारिरीक वाढ चांगली होईल यासाठी ही बंदी असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
२०२१ मध्ये नियमावली मात्र आता कडक अंमलबजावणी...
शाळेत दिल्या जाणाऱ्या अन्नाचे काही नियम असतात . २०२० शाळेच्या कॅन्टिन आणि परिसरात विक्रीसंदर्भातील नियम आहेत. त्याशिवाय २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र अनेकांना याबाबत स्पष्टता नाही. मात्र आता याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. यासंदर्भात शाळांचं विविध पातळीवर मार्गदर्शन केले जाईल असंही मुंढे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, सर्व मंडळं, कोणत्याही बोर्डाच्या शाळांसाठी हा नियम लागू असेल. याशिवाय शाळेतील कॅन्टिन, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकघर किंवा सर्व अन्न पुरवठादार यांना परवाना अनिवार्य असेल. परवानाशिवाय ते शाळेत अन्न पुरवू शकत नाही. शाळेच्या आवारात आणि शाळेच्या परिसरात ५० मीटरपर्यंत (शाळेच्या भितींपासून आजूबाजूचा परिसर) हाय फॅट, साखरयुक्त पदार्थांची मोफत विक्री, जाहिरात करण्यास बंदी असेल. मुख्य म्हणजे याबाबतीतील अंमलबजावणी मुख्याध्यापकाची, प्राचार्य जबाबदारी असेल. विशेष म्हणजे पहिले ते १२ वीपर्यंतच्या शाळांसाठी हे नियम अनिवार्य असतील.
वाढदिवशी केक-चॉकटेल्सवरही बंदी...
अनेकदा वाढदिवशी किंवा स्पेशल दिवशी शाळेकडून केक-चॉकलेट्स दिले जातात. मात्र नव्या अंमलबजावणीअंतर्गत यास बंदी घालण्यात आली आहे.
कोणकोणत्या पदार्थांवर बंदी...
तळलेले पदार्थ
चिप्सची पाकिटं
साखरयुक्त पदार्थ
फॅटयुक्त
ट्रान्सफॅट
वडापाव
बर्गर
पिझ्झा
कोल्ड्रिंक्स
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world