मध्य रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून एकट्या महिला टीसीने एका दिवसात 55 हजार 210 रुपये वसुली केली आहे. सुधा द्विवेदी असं या महिला टीसीचं नाव आहे. एका दिवसात एवढी मोठी वसुली हा एक रेकॉर्डच आहे. सुधा द्विवेदी यांच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर मध्य रेल्वेने याबाबत ट्वीट करत त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस (टीसी) असलेल्या द्विवेदी यांनी 28 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कसाठी ही रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. एकाच दिवसात वैध तिकिटे नसलेले किंवा अनियमित तिकिटे असलेल्या 202 प्रवाशांना द्विवेदी यांनी पकडले आणि त्यांच्याकडून 55 हजार 210 रुपये दंड स्वरुपात वसूल केले.
(नक्की वाचा- हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ)
याआधी सुधा यांच्या सहकाही रुबिना इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी 150 प्रवाशांवर एका दिवसात कारवाई केली होती. शुक्रवारी सुधा द्विवेदी हा विक्रम मोडीत काढला. खारघर येथून सकाळी 6.48 वाजता त्यांनी आपली ड्युटी सुरु केली आणि दुपारी 3.30 वाजत्या त्यांनी काम थांबवलं. जवळपास दर अडीच मिनिटांनी एका फुकट्या प्रवाशाला त्यांनी पडकलं. एकाच वेळी दोन ते सात तिकीट नसलेल्या प्रवाशांच्या गटाला देखील त्यांनी पकडले. ज्यामुळे त्यांची संख्या वाढली.
(नक्की वाचा- Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार)
सुधा द्विवेदी यांच्या कामामुळे त्यांना 'अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार' 2024 मिळाला. गेल्या आर्थिक वर्षात, त्यांनी 9501 प्रकरणे शोधून काढली आणि त्यातून 32.25 लाख रुपयांचा दंड वसूल केला. प्रत्येक तिकीट तपासनीसाला दररोज 20-25 जणांना पकडण्याचं टार्गेट असतं. मात्र सुधा द्विवेदी या सातत्याने 40 किंवा त्याहूनही अधिक अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडतात.