मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दादरमधील एका व्यापाऱ्याला दोषी ठरवून दंड ठोठावला आहे. मुंबईत अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी झालेली ही पहिलीच कायदेशीर शिक्षा आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नितीन शेठ (वय 52) असे या व्यापाऱ्याचे नाव असून ते दादरचे रहिवासी आहेत. 1 ऑगस्ट 2025 रोजी माहीममधील एल. जे. रोडवर असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलजवळील कबुतरखान्यात त्यांनी कबुतरांना दाणे टाकले होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते, हे माहित असूनही त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
वांद्रे येथील 9 व्या न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यू व्ही मिसाळ यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी हा निकाल दिला. न्यायाधीशांनी याबाबत निरीक्षणात नोंदवले की, "तुमचे हे कृत्य मानवी जीवन, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. सरकारी आदेशांचे उल्लंघन करून तुम्ही असा संसर्ग पसरवण्यास हातभार लावला आहे, जो जीवावर बेतू शकतो."
शिक्षा आणि दंड
नितीन शेठ यांनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आणि माफीची विनंती केली. न्यायालयाने भारतीय न्याय संहिता, 2023 च्या खालील कलमांनुसार दंड सुनावला. कलम 223 (ब) नुसार लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल 3000 रुपये दंड. तर कलम 271 जीवघेणा आजार पसरवण्यास कारणीभूत ठरेल असे निष्काळजीपणाचे कृत्य केल्याबद्दल 2000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 5000 रुपयांचा दंड या व्यापाऱ्याला भरावा लागला आहे.
तज्ज्ञांच्या मते, कबुतरांच्या संपर्कामुळे 'हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस' सारखे गंभीर श्वसनविकार होऊ शकतात. यामुळेच उच्च न्यायालयाने मुंबईतील पेक्षा जास्त कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.