Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात एका गोष्टीची मोठी दहशत पसरली आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील भागात वन विभागाकडून गस्त घातली जात आहे. काही दिवसांपूर्वी या उद्यानाजवळील भागात बिबटा असल्याचे काही व्हिडिओ समोर आले होते. (Mumbai Leopard) त्यानंतर वनविभागाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे.
संजय गांधी उद्यानात वन अधिकाऱ्यांची गस्त...
काही दिवसांपूर्वी संजय गांधी उद्यानाजवळील मुलुंड, भांडुप, पवई आणि गोरेगाव या भागांमध्ये बिबट्या फिरतानाचे विविध व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान वन विभागाकडून मुंबईकरांना काळजी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. ३० नोव्हेंबरला वन अधिकाऱ्यांनी उद्यानाजवळील भागात गस्त घातली. भीतीची परिस्थिती नसल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Navi Mumbai : अल्पवयीन मुली टार्गेटवर? नवी मुंबईतून गायब होतायेत मुली, काल 4 तर आणखी दोघी बेपत्ता
मुंबईतील परिस्थिती पुणे-जुन्नरपेक्षा वेगळी...
गेल्या काही दिवसात पुणे-जुन्नर या भागात बिबट्याने अनेक निष्पाप नागरिकांच्या गळ्याचा घोट घेतला. आतापर्यंत कित्येक जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. इथे मानव-प्राणी संघर्षाच्या घटना वाढत आहेत. मात्र मुंबईतील परिस्थिती वेगळी असल्याचं AWW (रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर) चे पवन शर्मा यांनी सांगितलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या जवळ असलेल्या आरेच्या सीमा भागात बिबट्या दिसणे ही सामान्य घटना आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एआय जनरेटेड व्हिडिओ व्हायरल केले जातात. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे अशा फेक व्हिडिओंपासून अलर्ट राहण्याचा इशारा पवन शर्मा यांनी दिला आहे.