
मनोज सातवी
मुंबई पासून साधारण 125 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढवण येथे देशातील सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या दहा मोठ्या बंदरां पैकी एक असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जाणार आहे. या बंदराच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी, येथील कनेक्टिव्हिटी लक्षात घेता राज्य सरकारने 13 गावातील 33.88 चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 107 गावांतील 512 चौ. किमी क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ नवी मुंबई सारखी 'चौथी मुंबई' वसणार आहे. या चौथ्या मुंबईमुळे पालघर जिल्ह्याचा कायापालट होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदरापासून मुंबई-दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग अगदी जवळ आहे. शिवाय पश्चिम रेल्वे लगतच समर्पित मालवाहू रेल्वे कॉरिडोर (DFCC), सध्या युद्धपातलीवर काम सुरू असलेला मुंबई - वडोदरा एक्सप्रेस वे आणि साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. शिवाय येथेच समृद्धी महामार्ग देखील जोडला जाणार आहे. बंदारात येणारा माल रेल्वे आणि रस्ते मार्गाने देशभर पोहोचवता येईल, असं सरकारचं धोरण आहे. त्यात आता एमएसआरडीसी 388 किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि 498 किमी लांबीचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पालगत 105 गावांतील 449.3 चौ. किमी क्षेत्रावर 13 विकास केंद्र होणार आहेत. या विकास केंद्रांमध्ये वाढवण विकास केंद्राचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
पालघर जिल्हा हा मुंबईपासून जवळ असला तरी, जिल्ह्याच्या विकासामध्ये मात्र मोठी तफावत आहे. एकीकडे देशातील सर्वात मोठे आणि सुसज्य असे जिल्हा मुख्यालय आहे. तर दुसरीकडे जव्हार, मोखाडा विक्रमगड, तलासरी येथील लोकांना रोजगारासाठी आजही स्थलांतर करावं लागतं, अशी स्थिती आहे. मोठ्या किंवा महत्वाच्या उपचारासाठी रुग्णाला मुंबई किंवा गुजरातला न्यावं लागत. त्यामुळे वाढवण बंदरालगत शहर उभारलं गेल्यास स्थानिक नागरिकांना सर्व मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील असे येथील नागरिकांचे मत आहे.
देशातील सर्वात मोठे बंदर ठरणाऱ्या 'वाढवण'लगत आणखी एक शहर अर्थात चौथी मुंबई वसविण्याचे सरकारचे नियोजन आहे. यामध्ये वाढवण जवळील वंधवन, आंबीस्तेवाडी, वसगाव, वरोर, ताडियाले, धुमकेत, गुंगावडा, पोखरण, बहाडा-पोखरण, चांदेगाव आणि धाकटी डहाणू अशा 11 गावांमधील 33.88 चौ. किमी क्षेत्रावर विकास केंद्राचे नियोजन आहे. याचा आणखी विस्तार होणार असल्याची देखील शक्यता आहे. मात्र हा विकास करताना, रोजगारासह इतर गोष्टींमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं, विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर, त्यांच्या उपजीविकेवर, संस्कृतीवर वरवंटा फिरवू नये अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world