समाजात समानता वाढविण्यासाठी आणि प्रवाहाबाहेरील घटकाला सामावून घेण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. समाजातील महत्त्वाचा मात्र दुर्लक्षित राहिलेले तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या तृतीयपंथीयांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, परिणामी त्यांना दुय्यम कामं करावी लागतात. त्यांना शिक्षणाच्या चौकटीत आणण्यासाठी 2024-25 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठाकडून त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने आज 23 एप्रिल रोजी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढवा हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने आगामी शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे सर्व अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची पूर्तता विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य, संचालक आणि परीक्षा विभागप्रमुखांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. या निर्णयामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार असून यामुळे त्यांच्या शिक्षणाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world