निनाद करमरकर, बदलापूर
बदलापुरात एका नराधमाने मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. तसेच ही बाब पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी महिलेला दिली. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पतीने त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांची चांगली मैत्री होती. मात्र एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली. यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला.
(नक्की वाचा- Latur Crime: क्षुल्लक कारण, भयंकर कांड, अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्राचा गळा चिरला)
अखेर पत्नीने हिंमत करून घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पतीने आपल्या मित्राला याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्याने याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारीला मित्राला घरी बोलावलं. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्या रात्री पीडितेच्या पतीने मित्राच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली.
त्यानंतर अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून मित्राच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव पतीने रचल्याची पोलिसांनी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.
(नक्की वचा- Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...)
पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याने हत्येची कबुली दिली आहे. आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्याने मित्राची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.