
Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी (शनिवार, 6 सप्टेंबर 2025) बाप्पाला निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जय्यत तयारी केली आहे. विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात 70 नैसर्गिक ठिकाणे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
10 हजार' अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज सज्ज
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन व्यवस्थेसाठी जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी 245 नियंत्रण कक्ष देखील कार्यरत असतील.
विसर्जन स्थळांवरील प्रमुख सुविधा
- 1,175 स्टील प्लेट्स - चौपाट्यांवरील वाळूत वाहने अडकू नयेत म्हणून खबरदारी
- 66 जर्मन तराफे - छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी.
- 2,178 जीवरक्षक आणि 56 मोटरबोटी - सुरक्षेसाठी.
- 594 निर्माल्य कलश - निर्माल्य संकलनासाठी.
- 307 निर्माल्य वाहने - जमा झालेले निर्माल्य नेण्यासाठी.
- 129 निरीक्षण मनोरे - गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी.
- 42 क्रेन - मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी.
- 287 स्वागत कक्ष - भाविकांच्या मदतीसाठी
आरोग्य आणि इतर आपत्कालीन व्यवस्था
विसर्जन स्थळांवर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 236 प्रथमोपचार केंद्रे आणि 115 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी 6,188 फ्लडलाईट आणि शोधकार्यासाठी 138 सर्चलाईट लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी 197 तात्पुरती शौचालये देखील उभारण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने आणि प्रशिक्षित मनुष्यबळही तैनात आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; मानाच्या गणपतींच्या वेळापत्रकासह नियमावली जाहीर )
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाचे आवाहन
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेने अधिकाधिक भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती तुम्ही खालीलप्रमाणे मिळवू शकता:
- भरती-ओहोटीच्या वेळा आणि सुरक्षेचे नियम
- अनंत चतुर्दशीच्या दिवशी समुद्रातील भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी.
- सकाळी 11:09 वाजता 4.20 मीटर उंचीची भरती.
- संध्याकाळी 5:13 वाजता 1.41 मीटर उंचीची ओहोटी.
- रात्री 11:17 वाजता 3.87 मीटर उंचीची भरती.
मत्स्यदंशापासून बचाव करा
ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफीश' आणि 'स्टिंग रे' माशांचा वावर वाढतो. यामुळे दंश होण्याची शक्यता असते. अशा घटना घडल्यास त्वरित जवळच्या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
विसर्जनादरम्यान घ्यायची काळजी
- समुद्रात खोलवर जाणे टाळा.
- महानगरपालिकेच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
- अंधाऱ्या ठिकाणी विसर्जनासाठी जाऊ नका.
- अफवांवर विश्वास ठेवू नका.
- लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world