
राकेश गुडेकर
कोकणी माणूस वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो, तो म्हणजे गणेशोत्सव. कोकणातल्या याच गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणून प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हटला की पंरपरा आणि वेगळेपणा आलाच. चाकरमानीही कोकणात दाखल झाले आहे. त्यामुळे कोकणात उत्सवाचं वेगळं वातावरण पाहायला मिळत आहे.

कोकणातल्या ग्रामीण भागात आजही मूर्तीशाळेतून गणरायाला अनेक ठिकाणी आपल्या डोक्यावरून आणलं जातं. भातशेतीच्या बांधावरून हिरव्यागार शेतातून ढोल ताशांच्या गजरात गणराय घरी आणतानाचं हे विहंगम दृष्य मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातं. कोकणातल्या अनेक खेडे गावात आज अशा पद्धतीने गणरायाला डोक्यावर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आपल्या घरी आणण्यात आलं.

गणपती डोक्यावरून आणणे ही परंपराच आहे. रत्नागिरीतल्या नाणीजमध्येही अशाच पद्धतीने अनेकांनी डोक्यावरुन गणरायांना आपल्या घरी आणलं आहे. संपुर्ण कोकणात अशाच पद्धतीने गणपती घरी आणले जातात. त्यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सध्या कोकणात पाहायला मिळत आहे. ऐन वेळी कोकणातली गावं ओस पडलेली दिसतात. पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातली गावं आता बहरली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सध्या उत्साहाचं वातावरण दिसत आहे. आज दिवसभर घरघुती गणरायाचं आगमन होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world