
गणेश उत्सव उत्साहात संपन्न झाला. गणेश विसर्जन मिरवणुकाही पार पडल्या आहेत. मात्र गणेशोत्सवा दरम्यान काही अशा गोष्टी घडल्या आहेत त्याच्या चर्चा आजही होत आहेत. त्यातीलच एक घटना आहे, अंबरनाथमधील गणपती बाप्पाच्या मोदकाच्या लिलावाची. अंबरनाथमध्ये खाछूश्याम मित्रमंडळाचा गणपती आहे. त्याच्या समोर ठेवलेल्या मोदकांचा लिलाव घेण्यात आला होता. त्यासाठी शहरातले सर्व जण उपस्थित होते. त्यावेळी या मंडळाच्या मोदकांच्या लिलावाला सर्वाधिक बोली ही आमदार बालाजी किणीकर यांच्या पत्नी शिल्पा किणीकर यांनी लावली. त्यानंतर त्यांना हा मोदक देण्यात आला. त्यांनी मोदकासाठी लावलेल्या बोलीची सध्या शहरात चांगलीच चर्चाच सुरू आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खाटूश्याम मित्र मंडळाकडून बाप्पासमोर मोदक ठेवण्यात आले होते. त्यातील महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा मंडळाची आहे. ही परंपरा गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे यावर्षीही हा लिलाव झाला. लिलावाची सुरूवात झाल्यानंतर पहिली बोली ही 67 हजार रूपयांची लागली. शहरातील अनेक जण या लिलावात सहभागी झाले होते. यात आमदार बालाजी किणीकर यांच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या. बोली एकावर एक लागत गेली. 67 हजारापासून सुरू झालेली बोली लाखात गेली. शेवटी शिल्पा किणीकर यांनी 2 लाख 22 हजारांची बोली लावली.
ट्रेंडिंग बातमी - DJ चा कहर? आवाजामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा दावा, तीन जण जखमी
त्यानंतर मात्र कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे हा महामोदक शिल्पा किणीकर यांना सपूर्द करण्यात आला. आमदार बालाजी किणीकर यांना आत्तापर्यंत 3 वेळा अंबरनाथकरांनी आशीर्वाद दिला आहे. यंदाही बाप्पाच्या आशीर्वादाने ते चौथ्यांदा निवडून येतील, असा विश्वास यावेळी आमदार किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला. तर खाटूश्याम मंडळाचे प्रमोदकुमार चौबे यांनीही लिलावानंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे आभार मानले. हा लिलाव पाहाण्यासाठीही गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world