मुंबईत सोमवारी संध्याकाळी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. तो 3 दिवसांपासून फरार होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अटक केलीय. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय,
कोण आहे भावेश भिंडे ?
गुजू अॅड्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे संचालक भावेश भिंडे याला लहानपणापासून बिझनेस क्षेत्रात स्वत: नाव कमवायचं होतं. युट्यूबवर एका मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. Noting is Impossible ही भावेशच्या कंपनीची टॅग लाइन आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भावेश भिंडे याचे वडील रिक्षाचालक होते. लहानपणी त्याच्या घरातील परिस्थिती हलाखीची होती. त्याने काही काळ एका अॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचंही काम केलं होतं. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1993 मध्ये त्याने स्वत:चा होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी रेल्वे जाहिरातींचे कॉन्ट्रॅक्ट घेत होती, यासाठी कमिशन देत होती.
भावेशने येथूनच आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्याने ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटूंगा, परेल या भागात आपला व्यवसाय वाढवला. एकाच अॅड एजन्सीने सेंट्रल रेल्वेचा इतका मोठा भाग व्यापल्याचं पहिल्यांदाच घडलं असल्याचं भावेशने स्वत: आपल्या मुलाखतीत सांगितलं.
(नक्की वाचा : थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग? )
भावेशच्या कंपनीच्या होर्डिंगवर कॅमेरा बसविण्यात आल्याचंही त्याने आपल्या मुलाखतीत सांगितलंय. नववी फेल असलेल्या भावेशने बिझनेस कशाच्या आधारे वाढवला असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता भावेशला अटक झाल्यानं त्याच्या नेटवर्कची खरी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.