राहुल कांबळे, नवी मुंबई
दिवाळीनिमित्त महापालिकेचे ठेकेदार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नेहमी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. परंतु यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडित करण्यात आली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवाळीनिमित्त महापालिका मुख्यालयात भेटवस्तू देण्यास मज्जाव केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे वेगळेच जिव्हाळ्याचे नाते आहे. त्याचबरोबर समाजातील काही राजकीय पदाधिकारी आणि समाजसेवक हेही काही अधिकाऱ्यांना जवळचे वाटतात. त्या प्रेमापोटी दीपावली हा आनंदाचा सण असल्याने एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करण्याची परंपरा आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या परंपरेला काहीसे अयोग्य स्वरूप आले आहे.
नक्की वाचा: शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 'या' मुस्लीम उमेदवाराला संधी
यामध्ये दीपावलीच्या कालावधीत ठेकेदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याकरता महापालिका मुख्यालयात दिवसभर गर्दी करत असतात. काही कर्मचारी आपली भेटवस्तू चुकू नये यासाठी दिवसभर कार्यालयातील खुर्ची देखील सोडत नाहीत. इतकेच नव्हे तर मागील वर्षी एक निवृत्त अधिकारी भेटवस्तू घेण्याकरिता मुख्यालयातील पार्किंगमध्ये गाडीमध्ये बसून होते आणि भेटवस्तू स्वीकारत होते.
इतकेच नव्हे तर अनेकदा एखाद्या ठेकेदाराने भेटवस्तू न दिल्यास त्याला चांगलेच लक्षात ठेवले जात होते. काही ठेकेदारांना इच्छा नसतानाही भेटवस्तू द्याव्या लागत होत्या. त्यामुळे यंदा थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अशा प्रकारे भेटवस्तू महापालिका मुख्यालयात आणण्यास मज्जाव केल्याने काही ठेकेदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
नक्की वाचा: काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार
त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व दुचाकी चारचाकी कसून तपासल्या जात आहेत. तसेच कोणतीही भेटवस्तू मुख्यालयामध्ये नेऊन दिली जात नाही. परंतु काहींनी यातून पळवाट शोधत भेटवस्तू थेट घरपोच करण्याचा सल्ला ठेकेदारांना दिला असल्याचीही माहिती मिळत आहे.