मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील प्रसिद्ध 'उडुपी विहार' हॉटेल ह गोरेगांवकरांच्या पसंतीस पडलेले एक प्रसिद्ध हॉटेल बनले आहे. 18 ऑगस्ट रोजी या हॉटेलमध्ये ग्राहकांना गेल्यावर प्रचंड धक्का बसला होता. राईस प्लेट 50 पैसे,जिलबी, पुरी भाजी, उसळपाव 12 पैसे आणि चहा फक्त 7 पैशांना मिळत असल्याचे पाहून ग्राहकांना आधी आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी हॉटेलच्या चालकांकडे आणि वेटरकडे मेन्यू कार्डवरील दरांबद्दल विचारणा केली. या सगळ्यांनी, मेन्यू कार्डमधले रेट हे बरोबर असल्याचे सांगितल्यावर ग्राहकांनी एकामागोमाग एक पदार्थ मागवायला सुरुवात केली. ते खाऊ घालताना ना किचनमधले लोकं वैतागले होते, ना बिल बनवताना काऊंटरवरचे लोकं. असं नेमकं काय झालं की या हॉटेलमध्ये चॉकलेटच्या दरात भरपेट जेवण मिळत होतं ? असा अनेकांना प्रश्न पडला होता.
इतक्या स्वस्त खाद्यपदार्थ का मिळत होते?
माहिती घेतली असता कळाले की ही खास ऑफर फक्त एका दिवसासाठी होती. या खास ऑफरमुळे राईस प्लेट फक्त 50 पैशांना, इडली आणि मेदूवडा फक्त 10 पैशांना मिळत होते. याशिवाय, दोसा, बटाटा वडा, पुरी भाजी आणि भजी प्रत्येक 15 पैशांना उपलब्ध होते. तसेच मंगळूरु पद्धतीचा उपमा, इडली आणि मेदूवडा फक्त 10 पैशांना मिळत होते. चहा तर केवळ 7 पैशांना आणि सरबत 10 पैशांना मिळत होते. या ऑफरची माहिती मुंबईत वाऱ्यासारखी पसरली होती. ही ऑफर खरंच आहे का हे पाहण्यासाठी आणि तिचा लाभ घेण्यासाठी या हॉटेलमध्ये तोबा गर्दी झाली होती.
नक्की वाचा: ना कोणती ऑफर ना कोणती सवलत! तरीही iPhone 16 आणि Samsung S24 Ultra ची किंमत 8 ते 12 हजारांनी कमी होणार ?
ग्राहकांचे आभार मानण्याची अनोखी पद्धत
गोरेगाव रेल्वे स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे हॉटेल गेल्या 63 वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत होते. उत्तम चव,परवडणारे दर यामुळे हे हॉटेल प्रसिद्ध होते. या हॉटेलशी असंख्य गोरेगांवकरांच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. मात्र हे हॉटेल आता बंद होतंय, कारण हे हॉटेल येत्या काही महिन्यात नव्या कोऱ्या इमारतीत सुरू झालेले दिसेल. जुन्या जागेत सुरू असलेले हॉटेल बंद करण्याच्या आधी ज्या ग्राहकांमुळे या हॉटेलला नावलौकीक मिळाला, त्याचे मालक सुंदर शेट्टी यांची भरभराट झाली त्या ग्राहकांना अभिवादन करण्यासाठी 62 वर्षांपूर्वी या हॉटेलमध्ये जे दर होते, त्याच रेटने पदार्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अतिथी देवो भव, म्हणजेच ग्राहक हा देवासमान असतो असे ब्रीदवाक्य मानणाऱ्या उडुपी विहारच्या मालकांनी नव्या जागेत जाण्यापूर्वी ग्राहकांकडून आशीर्वाद मिळावा यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.