Guillain Barre Syndrome Update : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे (GBS) नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दिवसेंदिवस जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 9 जानेवारी ते आजपर्यंत या आजाराचे एकूण 101 संशयित रुग्ण आढळले आहेत. सिंहगड रोड, खडकवासला, किरकीटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील असून काही रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगर पालिका तसेच इतर जिल्ह्यातील आहेत.
आजाराविषयी पथकामार्फत घरोघरी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना आव्हान करण्यात आले आहे की जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
- अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
- अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किवा कमजोरी.
- डायरिया (जास्त दिवसांचा)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास सुद्धा संसर्ग टाळता येईल.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
नक्की वाचा - GBS Update : पुण्यात जीबीएस रुग्ण शंभरीपार, ही 3 लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका!
केंद्राचा मदतीचा हात
पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोम आजारासंदर्भात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक राज्याच्या आरोग्य विभागांबरोबर एकत्रितपणे काम करेल. प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करेल. शिवाय सार्वजनिक आरोग्य विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापनात राज्याला हे पथक मदत करणार आहे.
महाराष्ट्रासाठीच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निम्हान्स बेंगळुरू, पुणे येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मधील सात तज्ञांचा समावेश आहे. एनआयव्ही, पुणे येथील तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करत असून आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world