
राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. दूषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पुण्यातील अनेक भागातील पाण्याचे 312 नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील 79 ठिकाणचे नमुने दूषित आढळले असून ते पिण्यास अयोग्य असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह खडकवासला परिसरातील पाणी नमुन्यांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्याने खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने होते. या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली. प्रयोगशाळेने 21 जानेवारी ते 13 मार्च या कालावधीत एकूण 312 नमुन्यांची तपासणी केली. त्यातील 79 पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे. पुण्यातील जीबीएस उद्रेक फेब्रुवारीच्या अखेरीस थांबल्याने पाणी नमुन्यांची तपासणी 13 मार्चनंतर आरोग्य प्रयोगशाळेने थांबविली.
आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत पिण्यास अयोग्य आढळलेले नमुने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. यात खडकवासला धरणातील पाण्यासह कूपनलिका, विहिरी, महापालिकेचा पाणीपुरवठा, खासगी जल शुद्धीकरण प्रकल्पांतील पाणी नमुन्यांचा समावेश आहे. खडकवासला धरणातील प्रक्रिया करण्यापूर्वीचे पाणी तपासणीत पिण्यास अयोग्य आढळले आहे. याचबरोबर खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने दूषित आढळले आहेत.
नक्की वाचा - Pune News : PMPML चा प्रवास होणार आणखी सुरक्षित; पुणे मनपाचा मोठा निर्णय
पिण्यास अयोग्य पाणी
- खडकवासला धरणातील प्रक्रिया न केलेले पाणी
- खडकवासला परिसरातील काही विहिरींचे पाणी
- धायरी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
- तळवडे, ताथवडे, दिघी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
- काळेवाडी, वाकड, मोशी, थेरगावमधील घरगुती नळांचे पाणी
- धायरी परिसरातील काही घरगुती नळांचे पाणी
- संत तुकारामनगर, धायरी परिसरातील आरओ प्रकल्पांतील पाणी
- आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रकमधील जारचे पाणी
- नऱ्हे गावातील घरगुती नळांचे पाणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world