Kalyan-Dombivli Rain Viral Videos : कल्याण,डोंबिवली,अंबरनाथ,उल्हासनगर आणि बदलापूर परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे.
डोंबिवली पश्चिमेतील साईनगर,कल्याण पूर्वेतील आडवली-ढोकळी,तसेच कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात सकाळपासून पाणी साचले होते.दुपारपर्यंत कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा,मंदिर परिसर तसेच कटाई-बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांना काही काळ रस्ते बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित ठिकाणी रस्ते तीन ठिकाणी फोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अनेक ठिकाणी झाडेही कोसळली
डोंबिवलीलगतच्या शिळफाटा-दायघर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शिळफाटा-मुंब्रा मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली.तर काही वाहनांचे नुकसानही झाले आहे. मुसळधार पावसामुळे डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
काही काळ चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती
दरम्यान,डोंबिवली एमआयडीसी परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असतानाच दोन शाळा एकाच वेळी सुटल्याने विद्यार्थी,पालक आणि वाहनांची मोठी गर्दी झाली.त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नालेसफाई वेळेत आणि प्रभावीपणे न झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे संबंधित विभाग आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world