Mumbai News : मुंबईतील अँटॉप हिल येथील मोठ्या सोसायटीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून महिला या घरात काम करीत होती. चोरीच्या संशयातून तिने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चोईसांग तामांग असं या तरुणीचं नाव आहे. ती मूळची दार्जिलिंगची आहे. दोन वर्षांपासून ती अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीत घरकाम करीत होती. ती तिथंच राहत असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अँटॉप हिल पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र त्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला होता.
नक्की वाचा - Dombivli News: महिला डॉक्टरवर स्वत:ला कोंडण्याची वेळ, शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रकार, धक्कादायक कारण
सुसाइड नोट सापडली...
दरम्यान घराचा तपास करीत असताना पोलिसांच्या हाती सुसाइड नोट सापडली आहे. मी प्रामाणिकपणे काम केले, काही चोरी केलेली नाही, असं लिहिलं आहे. या सुसाइड नोटमध्ये कुणावरही आरोप केलेला नाही. तामांग हिच्या वडिलांचीही चौकशी केली जात असून घरमालकाकडून माहिती मिळवली जात आहे.