जाहिरात

वाहनांना HSRP नंबर प्लेट कधीपर्यंत बसवता येणार? मुदतवाढीबाबत परिवहन आयुक्तांचं मोठं वक्तव्य

1 एप्रिल 2019 आधी किती गाड्यांची नोंदणी झाली आहे. त्या पैकी किती गाड्यांना या प्लेट लावल्या गेल्या आहेत. याचा आढावा परिवहन विभाग घेणार आहे.

वाहनांना HSRP नंबर प्लेट कधीपर्यंत बसवता येणार? मुदतवाढीबाबत परिवहन आयुक्तांचं मोठं वक्तव्य
मुंबई:

ज्या वाहनांची खरेदी 1 एप्रिल 2019 आधी झाली आहे अशा सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट म्हणजेच 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' लावणे बंधनकारक आहे. याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात अशा सर्व गाड्यांना  HSRP नंबर प्लेट लावण्याचं काम सुरू झालं आहे. याची मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. मात्र 1 एप्रिल 2019 आधी किती गाड्यांची नोंदणी झाली आहे. त्या पैकी किती गाड्यांना या प्लेट लावल्या गेल्या आहेत. याचा आढावा परिवहन विभाग घेणार आहे असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय ही घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन ही त्यांनी केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' लावणं बंधनकारक आहे. ज्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर गाड्या खरेदी केल्या आहेत अशा गाड्यांना HSRP नंबर प्लेट आहेत. मात्र त्या आधीच्या गाड्यांना या नंबर प्लेट नाहीत. अशा सर्व गाड्यांना आता यानंबर प्लेट लावाव्या लागणार आहेत, असं भिमनवार यांनी सांगितलं.  HSRP बाबत कोणीही गोंधळून जाऊ नये असं अवाहन ही त्यांनी केलं आहे. HSRP नंबर प्लेट बाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. HSRP नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची समजली जाते. 

(ट्रेंडिंग बातमी - हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य का आहे? फायदे समजून घ्या)

या प्लेटचे महाराष्ट्रातील दर इतर राज्यांच्या बरोबरीचे किंवा कमी आहेत, असा दावाही परिवहन आयुक्तांनी केला आहे. काही राज्यांच्या दरांचा अभ्यास करू या प्लेटचे आपले दर ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात 450 रू दुचाकी , 500 रू तीनचाकी आणि 745 रू चारचाकीसाठीचे दर असणार आहेत. ज्यांनी प्लेट लावायच्या आहेत त्यांनी परिवहन विभागाच्या  अधिकृत संकेतस्थळावरच याची नोंदणी करावी असं आवाहन ही त्यांनी केलं आहे. काही लोक याबाबत फसवणूक करत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर याची नोंदणी करावी असंही ते म्हणाले. 

(ट्रेंडिंग बातमी - वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार? वाचा दर)

दरम्यान एप्रिल 2019 आधी मोठ्या प्रमाणात गाड्याची खरेदी झाली आहे. त्यामुळे अशी गाड्या किती याचा अंदाज परिवहन विभागाला  घ्यावा लागणार आहे. HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत ही 30 एप्रिलपर्यंत होती. मात्र त्याच वेळी परिवहन विभाग आढावा घेणार आहे. त्यात किती वाहनांना या नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. किती गाड्या नंबर प्लेट लावण्यासाठी शिल्लक आहेत, याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज असल्यास यासाठी मुदत वाढ दिली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी परिवहन विभाग घेईल असंही  विवेक भिमनवार यांनी सांगितलं.