... अन् लाल परी सावरली, 1 कोटी 84 लाख महिलांनी दिली साथ

गेल्या वर्षभरात रेल्वे किंवा खासगी वाहनांपेक्षा अर्ध्या दरात तिकीट मिळत असल्याने महिला याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

महिला सन्मान योजनेमुळे एसटीतून (ST BUs) प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारी ते जुलै 2024 या सात महिन्यात रत्नागिरी विभागात 1 कोटी 84 लाख 92 हजार 852 महिलांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे विभागाला 34 कोटी 84 लाख 14 हजार 974 रुपये उत्पन्न मिळालं आहे. महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रात एसटीने कुठेही प्रवास करण्यासाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळाल्यामुळे नातेवाईक, देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये  महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या  यात साधी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत, शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षभरात रेल्वे किंवा खासगी वाहनांपेक्षा अर्ध्या दरात तिकीट मिळत असल्याने महिला याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहे. या चांगला परिणाम एसटीवर झाल्याचं दिसत आहे. ऐरवी तोट्यात असणाऱ्या लाल परीला सावरायला मदत मिळत आहे.