जाहिरात

Pune Crime News: व्याजाच्या पैशांसाठी शेतकऱ्याचं अपहरण; विवस्त्र करून बेदम मारहाण

Pune Crime News: आरोपी तुषार कोकाटे याने राहुल यांना बावडा येथील एका पेट्रोल पंपावर सोडले आणि "तू औषध पिऊन मरून जा, तू मेला तरच आमचे पैसे बुडतील" असा अमानवीय सल्ला दिला.

Pune Crime News: व्याजाच्या पैशांसाठी शेतकऱ्याचं अपहरण; विवस्त्र करून बेदम मारहाण

देवा राखुंडे, बारामती

Pune News: इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील राहुल बरकडे या शेतकऱ्याला खासगी सावकारांनी दिलेल्या अमानुष त्रासामुळे विष प्राशन करावे लागले आहे. 10 टक्के व्याजाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या राहुल यांनी मुदलाच्या दुप्पट रक्कम परत करूनही आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत अपमानित केले.

वादाचे मूळ कारण

राहुल बरकडे यांनी 2024 मध्ये विहीर खोदण्यासाठी सराटी येथील ओंकार किसन गिरी आणि अभिजीत किसन गिरी यांच्याकडून 10 टक्के व्याजाने 90 हजार रुपये घेतले होते. राहुल यांनी आतापर्यंत 2 लाख रुपये परत केले होते, तरीही आरोपी आणखी 90 हजारांची मागणी करत त्यांना सतत त्रास देत होते.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

सिनेस्टाईल अपहरण आणि अमानुष छळ

3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 च्या सुमारास लाखेवाडीतून एका काळ्या रंगाच्या 'थार' गाडीतून आलेल्या आरोपींनी राहुल यांचे अपहरण केले. मंदिरात जाऊ" असे सांगून त्याला आरोपींनी गाडीत बसवले, पण गाडी बावड्याच्या दिशेने नेली. चालत्या गाडीत चापट मारत मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवला. सराटी येथील ब्रिजखाली राहुल यांना विवस्त्र करून उभे केले आणि त्यांचा अपमान केला. "आमच्या गोठ्यावर काम करून पैसे देण्याची नोटरी करून दे," अशी मागणी करत त्यांना अकलूजपर्यंत नेले.

आरोपी तुषार कोकाटे याने राहुल यांना बावडा येथील एका पेट्रोल पंपावर सोडले आणि "तू औषध पिऊन मरून जा, तू मेला तरच आमचे पैसे बुडतील" असा अमानवीय सल्ला दिला. या मानसिक दडपणाखाली आलेल्या राहुल यांनी कृषी केंद्रातून कीटकनाशक आणले. तिथे उपस्थित असलेल्या इतर आरोपींनीही त्यांना औषध पिण्यासाठी प्रवृत्त केले.

(नक्की वाचा-  HSRP नंबर प्लेटची मुदत संपली; आता होणार थेट कारवाई, किती दंड बसू शकतो?)

राहुल यांनी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. राहुल यांनी मित्र अमोल घाडगे याला फोन केल्यानंतर, त्यांना तातडीने बावडा येथील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. इंदापूर पोलिसांनी अभिजीत गिरी, ओंकार गिरी, तुषार कोका आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com