देवा राखुंडे, इंदापूर
पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महायुतीत आतापासून रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु केलं आहे.
महायुतीमध्ये जर इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना गेली तर मी त्यांचं काम जोरात करेल, असं मोठं विधान इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. इंदापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीची नेमकी कुणाला सुटणार या संदर्भात चर्चेला उधाण आलेले आहे. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाते की भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मिळते याबाबत अजून तरी स्पष्टता नाही. दोन्ही पक्षांचे नेते आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असे बोलत असताना आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठे विधान केले आहे.
इंदापूर विधानसभेची जागा भाजपला म्हणजेच हर्षवर्धन पाटील यांना सुटली तर त्यांचा प्रचार करणार का? यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की मी जोरदार त्यांचा प्रचार करेन. त्यानंतर तिथे एकच हशा पिकला.
बंद दाराआड चर्चा काय झाली होती?
हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना मदत केली होती. त्या बदल्यात इंदापूर विधानसभेची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी आपल्याला शब्द देण्यात आला होता असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतच अजित पवारांनी शब्द दिला आहे असं ते म्हणाले.