देवा राखुंडे, इंदापूर
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद वाढली आहे. एकीकडे पक्षाची ताकद वाढली असताना शरद पवार यांचं टेन्शन वाढताना दिसत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर इंदापूरमध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातून इच्छुक असणारे जिल्हा बँकेचे आप्पासाहेब जगदाळे आणि सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेत 11 ऑक्टोबरला आपण बाजार समितीच्या आवारात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या मेळाव्यात जगदाळे आणि माने गटाने जनतेच्या दरबारात चेंडू टाकून तिसरी आघाडी तयार करत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
(नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट', उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर)
शरद पवार यांनी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागेल. इंदापूर तालुक्यात नाहीतर याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा इशाराचा आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे. माझं मन रडतयं. डोळ्याला पाणी येणार नाही पण मन रडतयं, असंही त्यांनी म्हटले आहे. तर प्रवीण माने यांनी म्हटलं की, पक्षातून सहा लोकांनी उमेदवारी मागितली होती. पक्षातील लोकांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र आज हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला आणि उमेदवारीही जाहीर झाली. लोक आम्हाला फोन करत आहेत, निर्णय घ्यावा असा आग्रह करत आहेत. त्यामुळे आघाडी करुन तिसरा सक्षम पर्याय दिला पाहिजे. तिसरा उमेदवार नसेल तर कोणाची किती ताकद कळणार नाही. कोणाला पदावर बसवायचं हा निर्णय जनतेचा आहे, असं प्रवीण माने यांनी म्हटलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच इच्छुक असणारे जगदाळे आणि माने यांनी यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. हजारो कार्यकर्ते घेऊन त्यांनी गोविंदबाग गाठले होते. तिथेच पक्षातील इच्छुक असणाऱ्यांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी त्यांनी मागणी शरद पवारांकडे केली होती. मात्र हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आणि याच सोहळ्यात शरद पवार यांनी थेट हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. त्यानंतर माने आणि जगदाळे गट आक्रमक झाला आहे.
(नक्की वाचा - "मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे", धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर निशाणा)
हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षातून इच्छुक असणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाईचे संचालक प्रवीण माने आणि कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी दांडी मारली होती.