- अदानी एअरपोर्ट्सने भारतातील सहा विमानतळांवर पाच राज्यांमध्ये एकात्मिक एअरपोर्ट सिटी विकास प्रकल्प सुरू केला
- मुंबई आणि नवी मुंबईतील जवळपास 440 एकर जागेत पहिल्या टप्प्यात 22 दशलक्ष चौरस फूट विकासाचा समावेश आहे
- हा प्रकल्प हॉस्पिटॅलिटी, रिटेल, मनोरंजन आणि व्यावसायिक सुविधा यांचा समावेश आहे
अदाणी एअरपोर्ट्सकडून भारतातील पाच राज्यांमध्ये 655 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर एकात्मिक एअरपोर्ट सिटी विकासाचे अनावरण करण्यात आले आहे. हा विकास प्रकल्प पाच राज्यांमधील सहा विमानतळांवर 655 एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेला आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबईतील जवळपास 440 एकर जागेचा समावेश आहे, तसेच पहिल्या टप्प्यात अंदाजे 22 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रावर मिश्र-वापर (मिक्स्ड-युज) विकास नियोजित आहे.
हॉस्पिटॅलिटी, रिटेल, व्यवसाय, मनोरंजन आणि भव्य संमेलन पायाभूत सुविधांनी युक्त अशा एकात्मिक एअरपोर्ट सिटीज उभारण्यासाठी अदाणी एअरपोर्ट्स पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर, दुबई, अॅमस्टरडॅम आणि सोल येथील विमानतळ परिसरांपासून प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट विमानतळांचे रूपांतर आर्थिक परिसंस्थेत करणे आहे. जे पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि शहरी विकासाला मोठी गती देईल.
अदाणी एअरपोर्ट सिटी लिमिटेड (एएसीएल) या भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानतळ चालक कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल)च्या उपकंपनीने आपल्या विमानतळ नेटवर्कवर एकात्मिक एअरपोर्ट सिटीज विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम लाँच केला आहे. या अंतर्गत हॉस्पिटॅलिटी, रिटेल, मनोरंजन, भव्य संमेलन आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी आणून त्या एकमेकांशी जोडलेल्या आणि चालण्यायोग्य शहरी भागांच्या स्वरूपात विकसित केल्या जातील. या विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. याद्वारे मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये अंदाजे 22 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा विकास केला जाईल.
या विकास प्रकल्पात पाच राज्यांमधील सहा विमानतळांवरील 655 एकरपेक्षा जास्त जमिनीचा समावेश आहे, ज्यामध्ये एकट्या मुंबई आणि नवी मुंबईतील जवळपास 440 एकर जागेचा समावेश आहे. नियोजित गुंतवणुकीपैकी जवळपास 70 टक्के हिस्सा मुंबई आणि नवी मुंबईत केंद्रित केला जाईल. यामधून मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) भारतातील अग्रगण्य व्यावसायिक, आर्थिक आणि विमान वाहतुकीचे केंद्र असल्याचे अधोरेखित होते. हा विकास प्रकल्प एकमेकांशी जोडलेला आणि प्रवाशांसाठी अनुकूल अशा शहरी भागांच्या स्वरूपात डिझाइन करण्यात आला आहे. येथे प्रवासी, व्यावसायिक आणि स्थानिक समुदायांना हॉटेल्स, कार्यालये, रिटेल, डायनिंग, मनोरंजन आणि संमेलन सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील, ज्या विमानतळ, मेट्रो आणि शहराच्या इतर वाहतूक व्यवस्थेशी उत्तम प्रकारे जोडलेल्या असतील.
एएएचएलचे डायरेक्टर जीत अदाणी म्हणाले, "जगभरात सर्वात यशस्वी ठरलेले विमानतळ परिसर व्यापार, पर्यटन आणि शहरी विकासाचे मुख्य केंद्र बनले आहेत. भारतातील विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत आहे, तसतसे विमानतळांना केवळ विमान प्रवासापलीकडे जाऊन मोठे मूल्य निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आम्ही एकमेकांशी जोडलेल्या एकात्मिक शहरी ठिकाणांचे नेटवर्क तयार करत आहोत, जिथे विमानतळ गुंतवणूक, रोजगार, प्रवाशांचा उत्तम अनुभव आणि ते ज्या शहरात आहेत त्या शहरांच्या दीर्घकालीन विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील." असं त्यांनी स्पष्ट केलं. हा विकास प्रकल्प सिंगापूरचे चाँगी, दुबई इंटरनॅशनल, अॅमस्टरडॅमचे शिफोल आणि सोलचे इंचेऑन यांसारख्या जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या विमानतळ परिसरांपासून प्रेरित आहे. ज्याच्या माध्यमातून भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठेत विमानतळ-केंद्रित विकास मॉडेल आणले जात आहे.
या विकास प्रकल्पांची रचना जागतिक दर्जाच्या आघाडीच्या डिझाइन आणि इंजिनिअरिंग भागीदारांसह केली जात आहे. ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी, रिटेल, वर्कप्लेसेस् आणि मनोरंजन क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे," असे अदानी पुढे म्हणाले. "कनेक्टिव्हिटीसोबत उत्तम अनुभवाचा मेळ घालणारे वैविध्यपूर्ण व उत्साही परिसर निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे आर्थिक क्रियाकलाप वाढतील, रोजगार निर्मिती होईल आणि आसपासच्या समुदायांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण होईल."
पारंपारिक रिअल इस्टेट प्रकल्पांच्या तुलनेत हे एअरपोर्ट सिटी मॉडेल कनेक्टिव्हिटी आणि उत्तम अनुभवाभोवती डिझाइन करण्यात आले आहे. स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी हे परिसर विमानतळ परिसंस्थेचा नैसर्गिक भाग म्हणून नियोजित केले जात आहेत. हॉटेल्स, वर्कप्लेसेस्, रिटेल, मनोरंजन आणि संमेलन सुविधा एकाच छताखाली एकत्र करून या विकास प्रकल्पांचे उद्दिष्ट प्रवाशांसाठी अनुकूल गतिमान ठिकाणे तयार करणे आहे. जी आसपासच्या शहरांच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील. या उपक्रमाचा भाग म्हणून, एएएचएलने पाच लक्झरी आणि प्रीमियम हॉटेल्ससाठी आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत हॉटेल व्यवस्थापन करारांवर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये किम्पटन ब्रँडचे भारतात होणारे पदार्पण समाविष्ट आहे. कंपनी हॉस्पिटॅलिटी, फूड अँड बेव्हरेज, रिटेल आणि मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय भागीदारांना देखील या उपक्रमामध्ये सामील करत आहे.
शाश्वतता या उपक्रमाचा मुख्य स्तंभ आहे. सर्व एअरपोर्ट सिटी प्रकल्पांना यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून (यूएसजीबीसी) लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल डिझाइन (एलईईडी) गोल्ड प्री-सर्टिफिकेशन मिळाले आहे. ज्यामधून संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत डिझाइन, पादचाऱ्यांसाठी सुलभता आणि उच्च दर्जाच्या सार्वजनिक जागांवर दिलेला भर दिसून येतो.आज झालेल्या लाँच इव्हेंटमध्ये, एएसीएलने मास्टर प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील आपल्या भागीदारांचा सत्कार केला, ज्यामध्ये कोन पेडरसन फॉक्स (केपीएफ), बेनॉय आणि झनेरा स्पेस यांचा समावेश आहे; बांधकाम, डिझाइन आणि बिल्ड क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी), टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेड; तसेच कन्सल्टिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील सीबीआरई, जेएलएल आणि कुशमन अँड वेकफिल्ड यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world