
राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल, या उद्देशाने 'अपना भांडार' या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, कार्यकारी संचालक विकास रसाळ, महासंघाचे संचालक जयसिंग गिरासे, संचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा - Marathi Ekikaran Samiti: अचानक प्रकाशझोतात आलेली मराठी एकीकरण समिती काय काम करते?
पणन मंत्री रावल म्हणाले, महासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करुन त्या सुस्थितीत करुन घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेथे भाडेतत्वावर जागा आहेत. त्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, बचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी ‘अपना भांडार' सुरू करण्यात यावेत तसेच याठिकाणी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करुन घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी विक्रीची प्रभावी साखळी तयार करून राज्यात एक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावी, ज्या संस्था उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे आयोजित करण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री रावल यांनी महासंघाला दिले. यामध्ये इतर राज्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या संस्थांचे, इ कॉमर्स जाणणाऱ्या व्यक्ती, संस्थांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्या, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी कार्यकारी संचालक रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world