
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक भलतेच आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. अशात आणखी एका मंत्र्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात मंत्र्यानेच सरकारला दोन कोटींचा चुना लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये जमीन गेल्याचा बनाव जयकुमार रावल यांनी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. रावल हे सध्या फडणवीस सरकारमध्ये पणन मंत्री आहेत. जमीन बुडीताखाली जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र सरकारलाच मंत्री जयकुमार रावल चुना लावल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. या माध्यमातून रावल यांनी सरकारकडून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केलाय. पत्रकार परिषद घेवून त्यांनी ही बाब समोर आणली आहे.
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीची शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. त्याचे तसे कागदपत्र तयार केले. त्यातून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, असं गोटे यांचे म्हणणे आहे. असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप रावल यांनी केले.
त्यातून दबाव निर्माण करत तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यास भाग पाडले. त्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरल्याचे ही गोटे यांनी यावेळी सांगितलं. हे कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी आपले राजकीय वजन वापरत केल्याचे ही ते म्हणाले. या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारा विरोधात तक्रार देखील केली आहे. या आरोपानंतर रावल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावल आता याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world