राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून पडद्यामागे काय सुरू होते, याचा सर्वात मोठा उलगडा जयंत पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, जयंत पाटील यांनी अजितदादांसोबतच्या बैठकांचे सविस्तर तपशील जाहीर केले आहेत. "दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र करून शरद पवार साहेबांच्या देखत एकसंध राष्ट्रवादी उभी करायची आहे," अशी तीव्र भावना अजित पवारांची होती, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
माझ्या घरीच व्हायच्या बैठका
जयंत पाटील यांनी सांगितले की, "दादा आणि माझ्यामध्ये किमान 8-10 वेळा सविस्तर चर्चा झाली होती. बैठकीचे ठिकाण माझे घरच असायचे. पहिल्या दोन-तीन बैठकांमध्ये दादांनी साहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. साहेबांच्या विरोधात गेल्याची जी जनमानसातील भावना आहे, ती पुसून पुन्हा साहेबांच्या पक्षासोबत एकत्रित यायचे आहे, असा त्यांचा ठाम आग्रह होता."
(नक्की वाचा- Sharad Pawar on NCP: शरद पवारांची 3 मोठी विधाने, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणची शक्यता मावळली?)
12 फेब्रुवारीचा मुहूर्त
विलीनीकरणाची प्रक्रिया कशी ठरली, याचे टप्पे देखील जयंत पाटील यांनी मांडले. 16 जानेवारीला दोन्ही पक्षांतील काही प्रमुख नेते एकत्र जमले. तिथे ठरले की, आगामी जिल्हा परिषद निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि निकाल लागल्यानंतर विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करायची.
अजित पवारांना ही घोषणा 8 फेब्रुवारीलाच करायची होती. मात्र, दिल्लीत एका लग्नाचे निमंत्रण असल्याने जयंत पाटील यांनी ती तारीख बदलण्याची विनंती केली. अखेर 12 फेब्रुवारी 2026 ही तारीख सर्वांच्या संमतीने निश्चित झाली. 17 जानेवारीला पवार साहेबांसोबत झालेल्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले होते, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: मंचावर आले, दोनच वाक्य बोलले; अजितदादांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे भावुक)
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, "अजित पवारांनी मला सांगितले होते की त्यांनी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना विलीनीकरणाच्या निर्णयाची कल्पना दिली आहे. मात्र आता त्यांच्या पक्षात जे निर्णय घेतले जात आहेत, ते प्रफुल पटेल आणि तटकरे घेत आहेत. त्यांच्या पक्षाबद्दल मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही."