MVA Press Conference : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि तांत्रिक बाबींवरून विरोधी पक्षांनी अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी तर थेट 'महाराष्ट्र निवडणुकीचा सर्व्हर कोणीतरी दुसरं चालवतंय' असा संशय व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
काल सर्व विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून निवेदन दिले आणि आज त्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. जयंत पाटील यांनी सांगितले की, काल आम्ही सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांना मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. या चुका दूर करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले. यावर केंद्रीय आयुक्तांनी हे सर्व पुरावे केंद्राला पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. आज त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.
पुढे जयंत पाटील म्हणाले, आम्ही काही महत्वाचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला दाखवले. पुराव्यांसहित आम्ही त्यांना माहिती दिली आणि एक पत्र देखील दिले आहे. मतदार यादीत चुकीचे मुद्दे समाविष्ट आहेत. काही लोक पत्त्यांवर राहतच नाहीत. मतदार यादीतील त्रुटींवर काम सुरू असताना आलेल्या अनुभवावर जयंत पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केले. मुरबाड मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रुटी दाखवली, त्यानंतर श्रीमती गुप्ता यांचे नाव यादीतून काढण्यात आले.
आमचा प्रश्न आहे की, ही नावं कोणी काढली आणि कोणी स्थळ पाहणी केली? एकाच महिलेचे हे फोटो आहेत हे कोणी तपासायला सांगितले? या सर्व घटनांवरून त्यांनी अतिशय गंभीर निष्कर्ष काढला आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगांचा सर्व्हर कोणीतरी दुसरं चालवतंय, याचा आम्हाला संशय आहे. या सर्व प्रकारातून राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या हातात काही नाही, हे सिद्ध झाले आहे," असा मोठा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
विधानसभेची चूक पुन्हा होऊ नये
गेल्या विधानसभा निवडणुकीतही अनेक त्रुटी समोर आल्याचे त्यांनी आठवण करून दिली. विधानसभेला सगळ्या सिस्टिम मोडून काढल्या गेल्या आणि किती टक्के मतदान झालं हे जाहीर केलं नाही. आम्ही ज्या मतदान याद्या पाहिल्या, आता जर याच याद्या वापरल्या जात असतील, तर तीच चूक पुन्हा होईल," अशी भीती देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली.